पुणे : पावसाळा आला की अनेकांची पावलं पायवाटांकडे वळतात. धो-धो कोसळणारा पाऊस, चिखल, चारीबाजूला हिरवी चादर यांच्या साथीने ट्रेकिंग करण्याचे बेत आखले जातात. पण या ट्रेकिंगला जायची आवड असेल पण सवय नसेल तर मात्र त्याचा त्रास उद्भवू शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी काही विशिष्ट्य गोष्टींची तयारी नक्की करा.
सवय असलेले शूज :
अनेक जण पावसाळ्यात नवे शूज घेऊन ट्रेकला जातात. मात्र नव्या शूजची पायाला सवय नसल्याने दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात ट्रेक करताना नेहमीच्या वापराचे शूजच वापरा.
थेट मोठा ट्रेक नको :
उन्हाळ्यात शक्यतो ट्रेक केला जात नाही. त्यामुळे पावसात थेट मोठा आणि अवघड ट्रेक करणे जीवावर बेतू शकते. त्यापेक्षा सुरुवातीला चढ उतरण्यासाठी सोपे वाटतील असे ट्रेक करावेत. सवय झाल्यावर मोठे ट्रेक करायला हरकत नाही.
नवा टीशर्ट आणि ट्रॅकपँट अजिबात नको :
काही उत्साही मंडळी ट्रेकिंग सुरु करताना नवा टी-शर्ट किंवा ट्रॅकपँट खरेदी करतात. अर्थात नव्या कपड्याची फिटिंग आणि कम्फर्ट बऱ्याचदा कमी असल्याचे त्रासदायक ठरू शकतात. त्यापेक्षा सवयीचे, सैल, सुटसुटीत आणि लवकर वाळू शकतील असे कपडे घालायला प्राधान्य द्या.
नंतरचा त्रास टाळण्यासाठी सराव ठेवा :
थेट ट्रेक करू, काही होत नाही असा आत्मविश्वास फा:जील आहे. ट्रेक झाल्यावर पुढचे दोन दिवस उठताही येत नाही असा अनुभव अनेकांना येत असतो.काहींचे तर स्नायू दुखावल्याचेही बघायला मिळते. त्यामुळे आधी रोजचे चालणे आणि सराव असेल तर हा त्रास टाळता येऊ शकतो.
नवे शूज वापरायला सुरुवात करा
अनेक जण पावसाळ्यात नवे शूज घेऊन ट्रेकला जातात. मात्र नव्या शूजची पायाला सवय नसल्याने दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात ट्रेक करताना नेहमीच्या वापराचे शूजच वापरा.
ठिकाणं ठेवा डोळ्यासमोर :
एखाद्या दिवशी वेळ असतो, मूडही असतो पण ठिकाण ठरवून जायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा आत्ता वेळ असेल तर काही सोयीची ठिकाणे डोळ्यासमोर ठेवा. तिथली माहिती, जाण्याचे मार्ग माहिती करून घ्या. त्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा थेट निर्णय घेऊन जाता येईल आणि वेळीदेखील वाचेल.