पुणे : ‘मला केंद्र शासनाचा अर्जून पुरस्कार मिळाला मात्र; राज्य शासनाचा अद्याप कोणताही पुरस्कार मिळाला नाही,’ अशी खंत रिओ आॅलिंपिक मध्ये चमकदार कामगिरी करणारी महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर हिने बुधवारी पुण्यात व्यक्त केली. तसेच धावपटूंना सराव सिंथेटीक ट्रॅकवर, तर स्पर्धा आॅलिम्पिक ट्रॅकवर करावी लागते. या विरोधाभासाकडे लक्ष वेधून तिने आंतरराष्ट्रीय सुविधेचा आभाव असल्याचे आधोरेखित केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ललिता बाबर हिच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ललिता म्हणाली, , देशासाठी खेळण्याचा आनंद खुप मोठा आहे. पदक मिळाले नसले तरी आंतरराष्ट्रीय धावपटूंबरोबर खेळण्याची, त्यांच्याकडून अनुभव घेण्याची संधी मिळाली. आॅलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी होत असल्याने अनुभवाची कमी होती. या स्पर्धेत फार थोड्या फरकाने माझे पदक हुकले. मात्र, ही संधी २०२०च्या टोकिया आॅलिम्पिकमध्ये भरुन काढली जाईल. भारतामध्ये सर्वत्रच सिंथेटिक ट्रॅक आहेत तर आॅलिम्पिकमध्ये मोडल ट्रॅकचा वापर केला जातो. त्याचा परिणामही खेळाडूवर होऊन चार ते पाच सेकंदाचा फरकही पडत असतो. आॅलिम्पिकसाठी चार वर्षे सिंथेटिकवर सराव केल्यानंतर खेळाडूला आॅलिम्पिकच्या ट्रॅकवर धावावे लागते. त्यामुळे त्याबाबतची सुविधाही भारतामध्ये निर्माण करता आली तरी पदकाची संख्या वाढेल. भारतात सुविधा नाहीत, असे नाही; पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळायला हव्यात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक स्पर्धेसाठी मिळत नाही. सराव वेगळ्या ट्रॅकवर आणि स्पर्धा वेगळ्या ट्रॅकवर या परिस्थितीचा सामना करावा लागतो. खेळाडू एवढी मेहनत घेत असतो. तेव्हा त्याला सुविधाही तशा मिळायला हव्यात असेही ती म्हणाली. (क्रीडा प्रतिनिधी)
राज्य सरकारकडून पुरस्कारात दुर्लक्ष
By admin | Published: August 25, 2016 4:16 AM