थेऊर : थेऊर फाटा या ठिकाणी असणारी बँक आॅफ बडोदा नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असते. परंतु, महिना झाला सर्व्हर डाऊन असल्याकारणाने अक्षरश: बँकेतील कर्मचारीवर्गावर ग्राहकांच्या शिव्या खाण्याची वेळ आली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी असणाऱ्या या बँकेत सकाळी १० पासून बँक बंद होईपर्यंत ग्राहक ताटकळत उभे असल्याचे चित्र दिसत आहे.
सोलापूर महामार्गावरील तसेच त्यालगतच्या थेऊर, कुंजीरवाडी, धुमाळमळा, आळंदी म्हातोबा, कोलवडी अशा अनेक गावांतील शेतकरी, कामगार, कष्टकरी व व्यावसायिक वर्गाच्या ठेवी, पगार, कर्जे असे अनेक व्यवहार या बँकेशी निगडित असून मार्चअखेर असल्याकारणाने बँकेत गर्दीचे प्रमाण वाढलेले असतानाच सर्व्हर डाऊन, एटीएम बंद तसेच विविध समस्यांचा पाढाच ग्राहकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलून दाखवला. मागील आठवड्यात महिलांच्या बचत गटांची खाती खोलण्याच्या वेळी सर्व्हर डाऊन असल्याकारणाने बँकेतील कर्मचारी अक्षरश: बँकेच्या बाहेर येऊन सदरील टॅब हवेत वर धरून रेंज शोधत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बँकेच्या परिसरात एकमेव असणारे व अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेले एटीएमदेखील बंद अवस्थेत असल्याकारणाने ग्राहकांचा संयम सुटायला वेळ लागला नाही. पासबुक एंट्री मशीनदेखील बंद अवस्थेत पाहावयास मिळाले. सकाळी १० वाजता मिळालेले टोकन दुपारी ४ वाजेपर्यंत ग्राहक सोबत घेऊन फिरत असताना बँकेत आढळून आले. एवढेच नाही तर मशीनमध्ये अडकून पडलेले पासबुकदेखील कर्मचारीवर्गाने गेले कित्येक दिवस झाले तसेच ठेवले आहे.
दोन महिने झाले एटीएमसाठी असणारे सुरक्षा कर्मचारी कामावरून कमी केलेले आहेत. यामुळे एटीएमच्या सुरक्षेचा, निगा राखण्याचा तर प्रश्न आहेच; परंतु वयोवृद्ध असणारे व निरक्षर असणाऱ्या ग्राहकांना पासबुक प्रिंट करण्यात व पैसे काढण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.आम्हाला मान्य आहे, की सर्व्हर डाऊन असल्याकारणाने ग्राहकांची गैरसोय होत आहे. आम्ही लवकरच यावर काहीतरी पर्याय काढू; जेणेकरून ग्राहकांना आम्हाला योग्य त्या सेवा वेळेत देता येतील.- सुरेश म्हस्के, बँक मॅनेजरबँकेचे अशी सोय असल्याकारणाने अनेक ग्राहकांनी, आम्ही या बॅँकेतील ठेवी काढून घेणार आहोत. कारण आम्ही आमची सोय व्हावी, लवकरात लवकर कामे पार पडावी’ म्हणून इथे खाती काढलेली असून, आमची इथे गैरसोय होत असून, इथे गेलेल्या जादा वेळेमुळे आमचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याची नुकसानभरपाई आम्हाला कोण देणार? अशी चर्चा ग्राहकांमध्ये सध्या चालू असल्याचे निदर्शनास आले.