पुणे : मराठी हस्तलिखिते हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा वारसा, ज्ञानसाधनांपैकी एक महत्त्वाचा घटक आणि मराठी भाषा, इतिहास, संस्कृती आदींचे भांडार मानले जाते. महाराष्ट्रात आज वीस हजार हस्तलिखिते असावी, असा अंदाज आहे. पुणे शहरात त्यांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. इ. स. १४८२ पासून१९५० पर्यंतच्या काळातील हस्तलिखिते पाहावयास मिळतात. काही हस्तलिखितांमध्ये रंगीत चित्रेही आहेत. मराठीतील हस्तलिखिते जतन करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मराठीच्या अभ्यासकांसाठी ही जुनी हस्तलिखिते उपयुक्त ठरू शकतात. पण, अभ्यासकांचे त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे.पुण्यातील संग्रहालयात संस्कृतचेच संग्रह आहेत. त्यामध्ये भांडारकर संस्था, डेक्कन कॉलेज, पुणे विद्यापीठ जयकर ग्रंथालय, आनंदश्रम, भारत इतिहास संशोधन मंडळ, वैदिक संशोधन मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, निवृत्तीनाथ ग्रंथालय अशा लहान-मोठ्या संस्थांचा समावेश आहे. पण, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मराठीतील हस्तलिखितांचे जतन करण्यासाठी एकही संस्था नाही.भांडारकर संस्थेतून ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाल्यानंतर वा. ल. मंजूळ यांनी मराठीतील हस्तलिखितांचे संकलन, संग्रहणासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातून मराठीतील १२ हजारांवर हस्तलिखिते मिळवली आहेत. महाराष्ट्रातील अनेक ग्रंथालयांमध्ये दुर्मिळ हस्तलिखितांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी ग्रंथालयातूनही हस्तालिखिते मिळविली आहेत. या विषयी माहिती देताना मंजूळ म्हणाले, ‘‘१९व्या शतकात ब्रिटिश सरकारने हस्तलिखिते गोळा करण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने देशातून विविध भाषेतील १८ हजार हस्तलिखिते मिळविली. ती हस्तलिखिते मुंबईतील एशियाटिक सोसायटीत ठेवण्यात आली होती. मुंबईतील हवामान दमट असल्याने ही कामदपत्रे खराब होऊ लागली. त्यामुळे डेक्कन कॉलेजची स्थापना झाल्यानंतर सर्व हस्तलिखिते डेक्कन कॉलेजमध्ये ठेवण्यात आली. १९१७ नंतर ही कागदपत्रे भांडारकर संस्थेत आली. पुण्यातील बहुतेक संस्थांनी संस्कृत भाषेतील हस्तलिखितांवरच लक्ष केंद्रित केल्याने मराठी हस्तलिखितांकडे दुर्लक्ष झाले होते.’’अभ्यासक संस्था आणि वाचनालयांमध्ये मराठी हस्तलिखितांना हात लावला जात नसल्याचे समजल्यानंतर सर्व हस्तलिखिते मागून आणली. या हस्तलिखितांमध्ये १४८२ मधील तीर्थावळ आहे. १६४८ मधील भागवताची पोथी आहे. २ स्कंद आणि २०० पानी असलेल्या या पोथीत तब्बल २०० चित्रे आहेत. जगातील दुर्मिळ ठेवा म्हणून या पोथीकडे पाहिले जाते. देश-विदेशातील प्रदर्शनांमध्ये ही पोथी ठेवण्यात आली होती. आळंदीतील अजान वृक्षाखाली बसून रामजी उपाध्ये यांनी लिहिलेली हस्तलिखितेही उपलब्ध आहेत. वस्तुनिष्ठ माहिती देणारी ३० संतांची चरित्रही उपलब्ध आहेत. १९५९ ते १९९९ या काळातील १२ हजारांवर हस्तलिखिते शोधण्यात आली असल्याचे मंजूळ म्हणाले.मराठीतील हस्तलिखितांचे संकलन, संगोपन आणि संस्करण करण्यासाठी मराठी मॅन्युस्क्रिप्ट सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. मंजूळ यांच्यासह डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. एलिनोर झेलियट आणि डॉ. जेम्स नाय हे यात कार्यरत आहेत.(प्रतिनिधी)
मराठीतील हस्तलिखितांकडे दुर्लक्ष
By admin | Published: November 15, 2015 1:11 AM