लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या कामात आरोग्य निरीक्षक व संबंधित कर्मचारी वर्ग व्यस्त असल्याने, ‘होम आयसोलेशन’ (घरीच विलगीकरण) मध्ये असलेल्या रूग्णांच्या घराच्या दरवाजावर ‘होम आयसोलेशनचे स्टिकर्स’ लावण्यास क्षेत्रिय कार्यालयांकडे वेळच नसल्याचे आढळून आले आहे़ विशेष म्हणजे हे कारण थेट आरोग्य विभागाकडेही सांगण्यात आले आहे़
कोरोनाबाधित आहेत, पण सौम्य लक्षणे अथवा लक्षणेविरहित असल्याने ‘होम आयसोलेशन’ (घरीच विलगीकरण) चा पर्याय संबंधित रूग्णांकडून स्वीकारला जात आहे़ अशावेळी महापालिकेकडून संबंधित रूग्णांच्या घराच्या दरावाजावर ‘कोविड-१९ होम आयसोलेशन’ चे स्टिकर्स लावले जात आहे़ संबंधित व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होऊ नये अथवा ती व्यक्ती उपचाराच्या विहित कालावधीत घराबाहेर पडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येते़ याकरिता महापालिकेच्या पाचही झोनला प्रत्येकी दोन हजार असे दहा हजार स्टिकर्स आरोग्य विभागाने छापून पाठविले आहेत़ पण शहरातील पंधरा क्षेत्रिय कार्यालयांपैकी काही कार्यालयांनी आमच्याकडील आरोग्य निरिक्षक व संबंधित कर्मचारी वर्ग हा स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेच्या कामात व्यस्त असल्याने स्टिकर्स चिटकविण्याचे काम राहिले असल्याचे सांगून हात झटकले आहेत़
एकीकडे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींची विचारपूस करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तपास आरोग्य यंत्रणा करीत असताना, दुसरीकडे अशाप्रकारे कामातून हात झटकण्याचे प्रकार क्षेत्रिय कार्यालयांकडून होत असल्याने ‘होम आयसोलेशन’मध्ये असलेले कोरोनाचे रूग्ण ओळखायचे तरी कसे असा प्रश्न उभा राहिला आहे़
-------------------
‘होम आयसोलेशन’मध्ये असलेल्या रूग्णांच्या घराच्या दारावर स्टिकर्स लावण्यासाठी पाच झोनला प्रत्येकी दोन हजार स्टिकर्सचे वितरण करण्यात आले आहे़ तसेच सोसायट्यांबाहेर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रचे बॅनर लावण्यासाठी दोन हजार बॅनरही देण्यात आले आहेत़ ते स्टिकर्स व बॅनर आरोग्य विभागाने दिलेल्या पत्त्यानुसार लावण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रिय कार्यालयांची आहे़
- डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
--------------------------------------