लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या व पुणे शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या कात्रज तलाव परिसराची महापौर मुक्ता टिळक यांनी पाहणी केली. मात्र येथील एकही समस्या न पाहताच आपला पाहणी दौरा आटोपला. त्यामुळे सुमारे एक तास त्यांची वाट पाहत बसलेले पालिकेचे सर्व अधिकारी व त्यांचा फौजफाटा आपल्या कार्यालयात परतला.पुणे महानगरपालिकेतील प्रभाग ३८ मधील कात्रज तलाव परिसराची पाहणी महापौर मुक्ता टिळक यांनी केली. या वेळी कात्रज तलावाच्या शेजारील आरक्षित जागेची पाहणी, मांगडेवाडी येथून येणारे मैलापाणी कात्रज तलावामध्ये जात आहे याची पाहणी, कात्रज तलावाशेजारी असलेला बंद अवस्थेतील बायोगॅस प्रकल्पाची पाहणी, पीएमटी डेपोसाठी आरक्षित असलेल्या सातारा रस्त्यावरील जागेची त्यांनी पाहणी केली.महापौरांनी दौरा केला, त्यामुळे नवीन योजना या भागात येतील; मात्र जे कोट्यवधी रुपये खर्च करून काम या ठिकाणी झालेले आहे, ते काम व्यवस्थित चालू असणे सर्वांना अपेक्षित आहे. या ठिकाणी नवीन काही करण्यापेक्षा जे बंद पडले आहे त्यालाच नीट चालू केले तरी या भागाचा कायापालट होईल. या पाहणी दौऱ्यासाठी नगरसेविका मनीषा कदम, महिला बालकल्याण समिती अध्यक्षा राणी भोसले, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक प्रकाश कदम, कोंढवा येवलेवाडी प्रभाग समिती अध्यक्षा रंजना टिळेकर, नगरसेवक वीरसेन जगताप, नगरसेविका वृषाली कामठे, कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त नितीन उदास, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता किशोर पोळ, उद्यान निरीक्षक बाळासाहेब डोळस, उपअभियंता प्रकाश कोल्हापूरकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तारू, उद्यान विभागाचे उपअभियंता श्रीकृष्ण चौधरी यांच्यासह अनेक पालिका अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. या वेळी स्थानिक पत्रकारांनी या बंद असलेल्या प्रकल्पाविषयी महापौर मुक्ता टिळक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की बंद अवस्थेतील प्रकल्पांना देखभाल दुरुस्तीसाठी वर्गीकरणातून निधी देऊन प्रकल्प सुरू करणार आहोत. यासाठी प्रभाग ३८ मधील चारही नगरसेवकांना बरोबर बैठक घेणार आहे.झेंडा कधी फडकणार?कात्रज तळ्यामध्ये मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेले कारंजे, मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली फुलराणी, कात्रज तलावामध्ये साचलेला राडारोडा, कात्रजसह देशाचे वैभव वाढविणारा राज्यातील सर्वांत उंच असलेला झेंडा जो की मागील अनेक दिवसांपासून फडकलाच नाही, या सर्व गोष्टींची पाहणी त्यांनी न केल्यामुळे या सर्व विभागांचे अधिकारी आपआपल्या कार्यालयात जाऊन बसले.कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेत सत्ता नसताना वसंत मोरे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून स्मशानभूमीसारख्या परिसराला पर्यटनास्थळापर्यंत नेऊन ठेवले. मात्र, सध्या या भागात चार नगरसेवक आहेत, त्यापैकी दोन नगरसेविका सत्ताधारी आहेत, तरी या ठिकाणी फक्त मेंटेनन्ससाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.
कात्रज तलावाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष
By admin | Published: July 04, 2017 4:13 AM