पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी बाळाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलल्याने ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली. यात सखोल चौकशी सुरू असता डॉ. अजय तावरे याने पोलिसांना कारवाईदरम्यान ‘मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांची नावे घेणार’ अशी इशारावजा कबुली दिली आहे. त्यामुळे डॉ. तावरे नेमकी कोणाकोणाची नावे घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
याच चाैकशीतील माहितीवरून पोलिसांनी अतुल घटकांबळे नावाच्या मध्यस्थाला अटक केली आहे. त्यानेच या डॉक्टरांना पैसे पुरवल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नावही त्याने घेतले आहे. त्याविषयी तपास सुरू केला आहे.
अपघातामधील बाळाला वाचवण्यासाठी घटना घडल्यापासून शक्य तेवढे प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर, ससून रुग्णालयामधील डॉक्टरांना हाताशी धरत रक्ताचे नमुनेच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोपी बाळाचे वडील विशाल अग्रवाल याने डॉ. अजय तावरे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधलेला होता. त्यावेळी फोनवरून एका लोकप्रतिनिधीने डॉ. तावरे यांना आरोपी बाळाला मदत करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. नेमका हा लोकप्रतिनिधी कोण? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पोलिसांना याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली असली तरी नाव सांगण्यास पोलिस हात आखडता घेत आहेत, असेही दिसून येत आहे.
घटकांबळेच्या ताब्यातील रोकड शेजाऱ्याकडून जप्त :
या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावणारा अतुल घटकांबळे याच्या घराची गुन्हे शाखेने झाडाझडती घेतली. यावेळी पठ्ठ्याने या प्रकरणात मिळालेले अडीच लाख रुपये शेजारी राहणाऱ्या इसमाच्या घरात ठेवले होते. पोलिसांनी ते जप्त केले.
डिजिटल सीन रिक्रिएशन सुरू :
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे जागेवर जाऊन सीन रिक्रिएशनला मर्यादा येत आहेत. यामुळे पुणे पोलिस सरकारी संस्थेच्या मदतीने डिजिटल सीन रिक्रिएशन करत आहेत. यात घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. अल्पवयीन आरोपी घराच्या बाहेर कधी पडला, कुठे-कुठे गेला, त्याने काय काय केलं, त्याला कोण-कोण भेटलं, आलिशान कारने किती वेगाने दुचाकीला धडक दिली या सगळा घटनेचे डिजिटल सीन रिक्रिएशन करण्याचे काम सुरू आहे.