पुणे (राजगुरूनगर) : खेड तालुक्यातील चास ग्रामसभेने संपूर्ण दारूबंदी केलेले प्रकरण मंगळवारी चिघळले. दारूधंदा नष्ट करण्यासाठी पुढे असणाऱ्या महिलेच्या मुलावर सोमवारी (दि.२०) रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात गणेश चासकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली असल्याच्या भावना ग्रामस्थानी व्यक्त केल्या. चास गावात संपूर्ण दारूबंदीचा ठराव महिलांनी ग्रामसभेत एकमुखी केला होता. त्यानुसार गावात दारूबंदी होणे आवश्यक होते. तसे घडले नाही. गावात अवैध दारूविक्री सुरूच राहिली आणि ग्रामस्थांचा विरोधही. यातून अवैध दारूविक्री करणारे आणि ग्रामस्थ यांच्यात वाद आणि धुसफूस सुरू होती. या वादास दोन दिवसांपूर्वी पुन्हा तोंड फुटले. काही महिला व तरुणांनी पुढे होत एक दारूधंदा नष्ट केला. यामध्ये दडवलेले दारूचे कॅन बाहेर काढून फोडण्यात आले. या घटनेवेळी दारू विक्री करणाऱ्या महिला व ग्रामस्थ यांच्यात वाद झाला. या वादाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणानुसार वाद किती विकोपाला गेले, हे निदर्शनास आले. फुटेजनुसार संपूर्ण गावाला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती. चासमधील अवैध दारू धंद्यांविरोधात आवाज उठविणा-या महिलेच्या मुलावर मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केला. गणेश सोपान चासकर हा जखमी झाला. घनवटवाडी रस्त्यालगतच्या मोठ्यावर झोपलेला असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण चास गावातील ग्रामस्थ त्यामुळे संतप्त व भयग्रस्त झाले आहेत. हे प्रकरण चिघळून मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. हल्ला हातभट्टी दारू विक्री करणा-या महिलांनीच केला व त्यांनी दिलेली धमकी खरी केली अशी चर्चा गावात आहे.या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. हे प्रकरण पाहता ग्रामस्थ संतप्त झाले असून हे प्रकरण चिघळले आहे. तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.संजय मुळूक, ग्रामस्थ :गावात दारूबंदीचा ठराव आहे. तरीही गावात अवैध दारूविक्री सुरू आहे. गावात विविध अकरा ठिकाणी दारू विकली जाते. तरुण, शाळकरी मुले दारूच्या आहारी गेल्याचे दिसते. हा प्रकार खेदजनक आहे. खेड पोलीस ठाणे ते पोलीस अधीक्षक, आयुक्त आणि थेट मुख्यमंत्री यांच्यापर्यंत चासच्या दारूबंदी व दारूविक्रीचा विषय गेलेला आहे. तरीही अवैध दारूविक्री सुरूच असल्याचे दुर्दैव आहे.
असा आहे घटनाक्रम :* ग्रामसभा घेऊन महिलांनी केला चासला दारूबंदीचा ठराव.* ठराव करूनही अवैध दारूविक्री सुरूच* अकरा ठिकाणी दारू विक्री होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप* दारूविक्रीकरून ग्रामस्थांध्ये तीव्र संताप* दारूप्रकरण चिघळले; तरुणावर वार, गाव दहशतीखाली