पुणे/किरण शिंदे :- कोयता गॅंगच्या उच्छादनानंतर चर्चेत आलेल्या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदेही वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. कारण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सलग दोन दिवस या परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांना जे दिसते ते स्थानिक पोलिसांना दिसत नाही का असा प्रश्न आता विचारला जात आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सलग दोन दिवस हडपसर परिसरातील अवैध धंद्यांवर छापेमारी केली. हडपसर परिसरातील मंत्री मार्केट जवळ सुरू असणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या 16 जणांना ताब्यात घेतले तर काही हजाराचा मुद्देमाल ही जप्त केलाय. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सामाजिक सुरक्षा विभागाने पुणे सोलापूर रस्त्यावरील एका लॉजवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. त्या ठिकाणाहून तीन मुलींची सुटका करण्यात आली तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हडपसर परिसरात कोयता बँक आणि गुन्हेगारांनी धुमाकूळ घातल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोयता यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात हडपसर परिसरातील कोयता गॅंगचा मुद्दा मांडला होता. यानंतर पुणे पोलीस दलात चांगलीच खळबळ बाजी होती. खडबडून जागे झालेल्या पुणे पोलिसांनी हडपसर परिसरात रूट मार्च काढला होता. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या भागात गुन्हेगारांची झाडाझडतीही घेतली होती.
हडपसर पोलीस स्टेशनचा गुन्ह्याच्या बाबतीत वरचा क्रमांक लागतो. शहरात वर्षभरात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत होते. मोबाईल हिसकावणे, पादचाऱ्यांना लुबाडणे, घरफोड्या यासारख्या स्ट्रीट क्राईमच्या यासारख्या घटना या परिसरात सतत घडत असतात. त्यामुळे सतत होणाऱ्या या गुन्हेगारी घटनांवर अंकुश ठेवण्यात हडपसर पोलीस मात्र कमी पडताना दिसत आहेत.