पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत मागील महिन्यात शासन स्तरावर सकारात्मक घोषणा झाली. रीतसर शासन अध्यादेश निघण्याची प्रतीक्षा न करता, आता घाबरायचे कारण नाही. कारवाईची टांगती तलवार कायमची दूर झाली, अशी समजूत करून घेतलेल्यांनी राजरोस पुन्हा अवैध बांधकामे सुरू केली आहेत. आतापर्यंत केलेल्या अवैध बांधकामांवर तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला असताना, पुन्हा अशा बांधकामांचा जोर वाढल्याने महापालिका हतबल झाली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित होत होता, त्या वेळी राज्यात अन्य ठिकाणी विविध शहरांत अवैध बांधकामे झाली आहेत. कारवाई मात्र पिंपरी चिंचवडमध्येच का, असा सवाल काही राजकारण्यांसह नागरिकसुद्धा उपस्थित करत होते. त्याचे उत्तर नागरिकांच्या कृतीतून मिळू लागले आहे. शासन स्तरावर अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत निर्णक्ष अपेक्षित असताना नागरिकांना संयम उरलेला नाही. शासनादेशानंतर अनधिकृत बांधकाम करता येणार नाही, हे लक्षात घेऊन तत्पूर्वीच अनधिकृत बांधकामे उकरण्याची घाई केली जात आहे. शहराच्या विविध भागांत अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. शासन स्तरावर अनधिकृत बांधकामांबाबत झालेल्या बैठकंमध्ये अनेकदा कट आॅफ डेट निश्चित करण्यात आली. ३१ डिसेंबर २०१२ला निदान यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत. याची दक्षता घ्यावी, अशा सूचना शासनाने महापालिकेला दिल्या. ३१ डिसेंबरनंतरही बांधकामे सुरूच राहिली. अखेर महापालिकेने ३१ डिसेंबरनंतर सुरू असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊल उचलले. बांधकामे सुरू असताना महापालिकेच्या पथकाने त्या ठिकाणी भेटी दिल्या. बांधकाम सद्य:स्थितीची छायाचित्रे काढली. अनेकांना फौजदारी कारवाईच्या नोटीस दिल्या. त्या वेळी नागरिकांनी बांधकामाची स्थिती ‘जैसे -थे’ ठेवली. फौजदारी कारवाई होत असल्याच्या भीतीने अवैध बांधकामांचे प्रमाण नियंत्रणात आले होते. आता शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही. अवैध बांधकामे नियमितीकरणाबाबतची केवळ घोषणा होताच अवैध बांधकामे करण्यास जणू काही पूर्ण मोकळीक मिळाली आहे, असा नागरिकांनी समज करून घेतला आहे. नेहमीसारख्या महापालिकेच्या गाफीलपणापुळे दोन बांधकामांवर कारवाई केली जात असताना चार अवैध बांधकामे उभी राहत आहेत. यापूर्वी झालेल्या बांधकामांना अभय मिळावे, याकरिता नागरिकांनी यापुढे अवैध बांधकामे करण्याचे थांबवले पाहिजे. नागरिकांच्या या कृतीमुळे रेड झोन हद्दीतील बांधकामांचा प्रश्न सुटण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. महापालिकेने मागील आठवड्यात त्रिवेणीनगर परिसरात अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला. (प्रतिनिधी)
अवैध बांधकामे राजरोस
By admin | Published: April 26, 2016 2:04 AM