पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देय नसलेल्या तब्बल 60 लाख रुपये निधीचे 'सेंट्रल पूल' अंतर्गत वितरित करण्यात आले आहे. मात्र,ही बाब लक्षात आल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश महिन्याभरापूर्वी दिले. परंतु, अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विद्यापीठातील विविध विभागांना व प्राध्यापकांना केंद्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग व इतर संस्थांकडून संशोधन प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. संशोधनासाठी देण्यात आलेल्या निधी व्यतिरिक्त प्रशासकीय कामकाजासाठी सुमारे पंधरा टक्के रक्कम सुद्धा प्राप्त होते. ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून वित्त विभागातील अधिकारी व कर्मचारी मूळ वेतनाच्या प्रमाणात वाटून घेत होते. त्याला 'सेंट्रल पूल' असे संबोधले जाते. मात्र ,2019 मध्ये 'सेंट्रल पूल' अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या रक्कमेवर पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने निर्बंध घातले होते. तसेच त्याबाबतचे परिपत्रकही विद्यापीठ प्रशासनाने काढले. त्यामुळे सेंट्रल पूल अंतर्गत निधी वाटपाचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. विद्यापीठाचे वित्त व लेखा विभागाचे अधिकारी अतुल पाटणकर यांनी आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना तब्बल 60 लाख रुपयांचे वाटप करणे बेकायदेशीर ठरत असल्याचे सुमारे महिनाभरापूर्वी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून त्यांची कान उघाडणी केली होती. तसेच वितरीत केलेली रक्कम तात्काळ वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र,महिना उलटून गेला तरी त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कुलगुरू कार्यालयातून याबाबत वित्त विभागाला लेखी आदेश देण्यात आले आहेत.
विद्यापीठाकडे विविध संशोधन प्रकल्पाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या रक्कमेपैकी प्रशासकीय कामकाजासाठी प्राप्त होणारी वेगळी पंधरा टक्के रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून सेंट्रल फुल अंतर्गत वितरित केली जात होती. परंतु, संशोधन प्रकल्प अंतर्गत केलेले कामकाज हा प्रशासकीय कामाचाच भाग आहे. त्यामुळे यापुढील काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाऊ नये.असा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मध्ये घेण्यात आला होता. तरीही केवळ वित्त व लेखाधिकारी विभागातील कर्मचाऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत कुजबुज सुरू होती. अखेर रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.----------------------'सेंट्रल पूल'अंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून वसूल करावी,असे लेखी आदेश वित्त व लेखा विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाची कर्मचारी व अधिकाऱ्यांना देय नसलेली सर्व रक्कम वसूल केली जाईल.- डॉ नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ