पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन (महामेट्रो) च्या वतीने सध्या पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या कामासाठी विनापरवाना जास्त गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने तब्बल २० लाख ९८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड येत्या दहा दिवसांत जमा न केल्यास कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या सुमारे १०.७५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गात पिलर उभारण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. याबाबत आलेल्या तक्रारीवरून अपर तहसीलदार गीतांजली शिर्के यांनी पाहणी केली.त्यामध्ये अवैधरीत्या उत्खनन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे महामेट्रोने सुमारे २० लाख ९८ हजार १२५ रुपयांचा दंड भरण्याचा आदेश काढण्यात आला आहे. शिर्के यांनी केलेल्या तपासणीमध्ये महामेट्रोकडून सुमारे ७०१.६५५ ब्रास माती आणि मुरुमाचे उत्खनन जास्त झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महामेट्रोला रॉयल्टीसह चालू बाजार भावाच्या पाचपट दंड आकारण्यात आला आहे.खराळवाडी, वल्लभनगर येथे अवैध खोदाईया ठिकाणी खराळवाडी परिसर येथे एक पिलर उभारण्यात आला आहे; तसेच नाशिकफाटा येथील आयसीसी डीजीटीपी बिल्डिंग परिसर आणि वल्लभनगर एसटी स्टँड परिसरात उभारलेल्या पिलरसाठी खोदाई करण्यात आली आहे. ही खोदाई अवैध करण्यात आली आहे. पाहणीमध्ये माती आणि मुरुमाचे उत्खनन जास्त झाल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
बेकायदा उत्खनन : महामेट्रोला २१ लाखांचा दंड, दहा दिवसांत जमा केला नाही तर कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 5:14 AM