दावडी, निमगाव, खरपुडी, रेटवडी, होलेवाडी. या परिसरात मोठ्या प्रमाणात लिंब, चिंच, आंबा, चंदन अशी विविध प्रकारची झाडे आहेत. परंतु लिंब, चिंच या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात आहे. तसेच या भागात परप्रांतीयांच्या चार ते पाच टोळ्या सक्रिय आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या गोष्टींची माहिती आहे. परंतु या टोळ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. बेकायदा वृक्षतोडीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. एका टोळीमध्ये साधारण पाच ते सात जण असतात. टोळीतील लोक शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शेतातील आणि बांधावरील झाडे विकत घेतात. आर्थिक अडचणींमुळे काही शेतकरी नाईलाजास्तव त्यांच्या जाळ्यात फसतात. अधिसूचित असलेली झाडे तोडण्यासाठी वन विभागाची, तसेच अधिसूचित नसलेल्या झाडे तोडण्यासाठी महसूल विभागाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुसंख्य शेतकरी आणि टोळ्यांचे ठेकेदार संबंधित दोन्ही विभागांची परवानगी घेत नाहीत. एकदा झाडे विकत घेतली की, टोळीवाले कटिंग मशिनने सरसकट लहान-मोठ्या सर्वच झाडांची कत्तल करतात.
या टोळ्या चोरट्या पद्धतीने ओढे आणि नदीकाठच्या झाडांचीही सर्रास कत्तल करतात. झाडे तोडल्यानंतर लाकडाची रात्रीच्या वेळी व सुट्टीच्या दिवशी वाहतूक केली जाते. बेकायदा तोड केलेल्या लाकडांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु त्या त्या गावातील पर्यावरण कमिट्या व वनविभाग कोणतेही पाऊल उचलत नाही. वनविभागाचे कर्मचारी व लाकूड व्यावसायिकांच्यात असलेल्या हितसंबंधामुळे वर्षभरात लाखो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली आहे.
२३राजगुुरुनगर
निमगाव (ता. खेड) येथे बेकायदारितीने चिंचेच्या झाडाची कत्तल करण्यात आली आहे.