लोकमत न्यूज नेटवर्कमगरपट्टा : मगरपट्टा चौकात रोज रात्री चहाच्या हातगाड्यावर अवैधरीत्या गुटखा व दारू विकली जात असल्याचे दिसत आहे. विविध कंपन्यांतील रात्रपाळीवरून घरी जाणारे कर्मचारी या अनधिकृत चहाच्या हातगाड्यावर थांबतात. गाड्या रस्त्यात पार्क करतात, त्यामुळे वाहतूककोंडीही होत आहे.या चहाच्या हातगाडीवर गुटखा, सिगारेट व दारू विकत मिळते. महानगरपालिकेचे स्टीलचे बाकडे पुलाखालीच रस्त्यावर बसण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. गुंडप्रवृत्तीचे तरुण त्या ठिकाणी रात्रभर बसलेले असतात. पालिका प्रशासन व पोलीस त्यांच्यावर का कार्यवाही करीत नाहीत, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.व्यसन करणारे हा परिसर घाण करून टाकतात. मोठ्या वाहनांना वळण घेता येत नाही, कारण गाड्या रस्त्यावर उभ्या असतात. दिवसभर या हातगाड्या गायब असतात, हे सर्व प्रकार रात्रीचे चालू असतात. दारू व गुटखाबंदी असताना हा प्रकार अवैधरीत्या रोजच चालू आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अवैधरीत्या गुटखा, दारूची विक्री
By admin | Published: June 28, 2017 4:18 AM