लोणी काळभोर: येथील मुळा-मुठा नदीच्याकाठी बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची भट्टीचे लोणी काळभोर पोलीसांनी छापा टाकून नष्ट केली आहे. तेथे मिळून आलेले कच्चे रसायन व तयार दारू असा एकूण ३४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुददेमालही नष्ट करण्यात आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय जाधव यांना मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर ग्रामपंचायत हददीतील राहींजवस्ती, येथील मुळा - मुठा नदीच्या काठी राधेशाम हरीराम प्रजापती हा बेकायदेशीर गावठी हातभटटीची दारु तयार करण्याची भटटी चालवित आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. जाधव यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना दिली. त्यांनी पुढील कारवाईबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेटटी, पोलीस हवालदार विजय जाधव, सुनिल शिंदे, श्रीनाथ जाधव, नागलोत, वीर या पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी छापा घातला. त्यावेळी तेथे प्रजापती हा जमीनीमधील खडयामध्ये गावठी हातभटटीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन लाकडी काठीने ढवळत असताना दिसला. पोलीस पथकाची चाहूल लागताच तो पळून गेला. तेथे पाहणी केली असता पोलीसांना दोन जमीनीमधील प्लास्टिक कागदाच्या खडयामध्ये गावठी हातभटटीची दारु तयार करण्याचे २००० लिटर कच्चे रसायन व ३५ लिटर मापाचे प्लॉस्टिकचे १२ कॅनमध्ये प्रत्येकी ३५ लिटर गावठी हातभटटी तयार दारु असा एकुण ३४ हजार ४०० रुपये किंमतीचा माल मिळुन आला. सदरचा माल जागीच नष्ट करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५ नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे पथकाने केली आहे.