पुणे : शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला सरपंच महिलेने अवैध दारु विक्री करणाऱ्या एका दारु विक्रेत्याला चांगलेच धुतले. वारंवार ताकीद दिल्यानंतर सुध्दा त्याने दारुची विक्री गावात सुरुच ठेवली होती. या महिलेने मग दारु विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडे देखील तक्रार करत कारवाई करण्यासंदर्भात सूचना केली. मात्र, पोलिसांकडून पण त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर या 'दबंग' सरपंच महिलेने हाती लाकडी दांडके हातात घेत त्या दारु विक्रेत्याची चांगलीच धुलाई केली. तसेच परत गावात दारु विक्री न करण्याचा सज्जड दम भरला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला असून या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
पिंपरी दुमाला गावच्या 'दबंग' महिला सरपंचाचे नाव मनीषा खेडकर आहे. हा विक्रेता गेल्या अनेक दिवसांपासून गावातील काही लोकांच्या 'राजकीय' वरदहस्तामुळे दारूविक्री करत होता. मात्र, या दारू विक्रीमुळे बऱ्याच जणांचे संसार उध्वस्त झाले होते. त्यामुळे अनेक महिला गावात होणाऱ्या दारु विक्रीविषयी महिला सरपंचाकडे तक्रार करत होत्या. दारुमुळे होणाऱ्या कौटुंबिक हिंसा, अत्याचार यांचे वाढते परिणाम महिलेला अस्वस्थ करत होते. याबाबत कायदेशीर कारवाई होईल या आशेने त्यांनी अनेकदा पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवले, मात्र, पोलिसांकडून तात्पुरती कारवाई केली जात असत. काही कालावधीने मग पुन्हा दारुचे धंदे जोमात सुरू होत होते.
वारंवार सांगूनही गावात दारू विक्री करणारा व्यक्ती ऐकत नाही व पोलीस सुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही म्हटल्यावर महिला सरपंच मनीषा खेडकर यांना आपला संताप अनावर झाला. अखेर त्यांनी हातात लाकडी दांडके घेत या दारू विक्रेत्याची तुफान धुलाई करत त्याला चांगलीच अद्दल घडविली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नावापुरतीच दारु बंदी शिरुर तालुक्यात आहे की काय अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
आक्रमक अवतार धारण करणाऱ्या महिला सरपंच मनिषा खेडकर यांनी दारु विक्रेत्याला बेदम चोप देत चांगलेच वठणीवर आणले. या घटनेमुळे अवैध दारु विक्री करण़ाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. खेडकर यांनी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन शेळके, पोलीस पाटील संतोष जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या दारू विक्रेत्यास चांगलाच धडा शिकवला. झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे व मनीषा खेडकर यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.