काटी : पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांना विश्रांतीसाठी तसेच भोजनासाठी हॉटेल सुरू केले जात आहेत. त्यातील बहुतांश हॉटेल चालकांनी दारूविक्रीचा परवाना न घेताच दारूविक्री सुरू केली असून त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग म्हणजे अवैध दारूविक्रीचे खुलेआम अड्डे बनले आहेत.
महामार्गावर काही हॉटेलवर खुलेआम दारूअड्डे चालू आहेत. याबाबत पोलीस यंत्रणा गप्प का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनाकडून व्यक्त केला जात आहे. काही हॉटेलवर खाद्यपदार्थांत भेसळ करून शिळे अन्न, कमी प्रतिचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. कमी कालावधीत जास्तीत जास्त अर्थिक फायदा मिळवण्यासाठी काही हॉटेलचालक सर्व नियम धाब्यावर बसवत राजरोसपणे हे धंदे जोरात सुरू केले आहेत. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी होणे गरजेचे आहे.याबाबत पोलिसांनी जाणूनबुजून डोळेझाक करत असून या खुलेआम दारूविक्रीला वेळीच आळा न घातल्यास महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र या अवैध धंद्यांमुळे पुरता भरडला जात असून त्यांच्याकडून तक्रार झाल्यास त्याच्याकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. अवैध व्यवसायाला पाठबळ देणारे नक्की कोण आहेत, यावर पोलिस आणि अन्य औषध प्रशासन कारवाई करणार का याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.एखाद्या अवैध धंद्याबाबत माहिती मिळाल्यानंतरच कारवाई होणे अपेक्षित असते. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणतेही कारवाई होत नाही. पोलिसांनी कोणत्या भागात अवैध धंदे आहेत, त्या धंद्यांची रितसर माहिती घेणेही गरजेचे आहे. अन्यथा अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळण्यास वेळ लागणार नाही.