सांगवी (बारामती): आधीच कोरोनामुळे संसाराची वाट लागलीय! त्यात दररोज दारू पिऊन येणारा नवरा घरी येताच महिलांच्या डोक्याला ताप ठरत आहे. घरात मुलांबाळाना खायला काय घालायचं? अशा अनेक प्रश्नांनी तिला बेजार करून टाकले. घरात खाण्यापिण्याच्या वांदया बरोबरच अनेक समस्या सातत्याने तिच्याभोवती घोंगावत असतानाही नवऱ्याला दारू मिळतेच कशी?'' या प्रश्नाने बारामती तालुक्यातील अनेक व्यसनाधीनाच्या घरातील महिला गांगारून गेली आहे. बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारू व्यावसायिकांनी उच्छाद मांडला आहे. या अवैध दारू धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.
बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेखळी गावात सुरु असणाऱ्या अवैध दारु विक्रीमुळे रोज घरी दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्याबद्दल भरसभेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर अजित पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दारू धंद्यावर कारवाई करून प्रसंगी टाडा लावून दारूचे धंदे कायमचे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बारामती शहर, वडगाव निंबाळकर, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीसह संपूर्ण तालुक्यात पोलिस यंत्रणा कामाला लागून दारू अड्ड्यावर धडक कारवाया करण्यात आल्या. यामुळे दारू विक्रेत्यांवर जरब बसून धंदे कायमचे बंद होतील याची नागरिकांना आशा होती.
मात्र कारवाईनंतर देखील बारामती शहर, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनसह बारामती तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील सांगवी, माळेगाव, पाहुणेवाडी, शिरवली, खांडज, निरावागजसह अनेक गावांत दारूचे अड्डे खुलेआमपणे सूरूच आहेत. दारूचे फुगे, देशी विदेशी दारूच्या बाटल्याची जोरात विक्री होत असते. दारूसाठी दररोज तळीरामांची पहाटे पासुनच दारू अड्ड्यावर गर्दी झालेली असते. वर्षांत कित्येकदा त्याच दारू विक्रेत्यांवर कारवाई करून देखील हे धंदे बंद होताना दिसत नाहीत. अनेकदा दारू बंदीसाठी महिलांकडून पोलिस ठाण्यावर मोर्चे काढण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. परंतु अवैध धंद्यामधून पोलिसांना मिळणारा मलिदा यामुळे पोलिस देखील जुजबी कारवाई करून दिखावा करताना पाहायला मिळाले. त्यानंतर देखील पुन्हा पोलिसांच्या वरदहस्ताने हे धंदे सुरू होत असतात.
गावात अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यास पोलिसांचा देखील प्रतिसाद मिळत नाही. तर पोलिस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग आणि अवैध धंदेवाले यांचे आर्थिक हित संबंध लक्षात आल्याने हे धंदे बंद होणार नसल्याचे माहिती असल्याने नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. यामुळे पोलिस अधिकारी देखील हद्दीत अवैध धंदे बंद असल्याचा ठेंगा मिरवतात. यामुळे अनेक गावांत पदाधिकाऱ्यांसह, गावकरी मेटाकुटीला आली. राज्यात प्रशासनावर पकड व दबदबा असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती तालुक्यातील पोलिस प्रशासनच मात्र याकडे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.