लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक कारखान्यात ड्रग फॅक्टरी चालवली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर आता अशा गोरखधंद्यांवर वॉच असणे महत्त्वाचे ठरू लागले आहे. पोलीस, प्रशासन यांनी सतर्कता बाळगून अशा औद्योगिक क्षेत्रांची पाहणी करायला हवी, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तब्बल १०० कोटींचे ड्रग छाप्यामध्ये सापडल्यानंतर ड्रग तस्करीसाठी अशा जागा हेरून त्यासाठी साठा करण्याचे षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. अवैध अमली पदाथार्चे उत्पादन करून अरबो रुपयांची कमाई करून झटपट श्रीमंत होण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. कुरकुंभ येथे सहा महिन्यापूर्वीही असाच ड्रगचा साठा सापडलेला होता. त्यामुळे अशा औद्योगिक क्षेत्रांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखीत होत आहे. प्रदूषण होते तर गप्प का?कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रदुषणाने येथील ग्रामस्थ त्रस्त असून देखील आज पर्यंत एकही जनआंदोलन या ठिकाणी झाले नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांचीही सतर्कता महत्त्वाची आहे. अवैध व्यवसायाला चाप अवैध व्यवसायाला खतपाणी घालणाऱ्या कंपनी चालकांना चाप बसने गरजेचे आहे . मोठ्या प्रमाणत रसायनांचा साठा बाळगून गुपचूप पणे असे गोरख धंधे कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात सर्रास सुरु असल्याचे या प्रकारावरून दिसत आहे. भंगार व्यवसाय ,विविध रसायनांच्या चोऱ्या व परिसरात अवैध धंदे फोफावले आहेत. तपासणी होते का नक्की?कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांमध्ये उत्पादित केले जाणारे उत्पादन, त्यांना लागणारा कच्चा माल, विविध रसायने, त्यांचा साठा याचे वेळोवेळी तपासण्याचे काम केले जाते तरीही कोट्यवधींचे ड्रग लपवले कसे जाते याचे गौडबंगाल मात्र उलगडलेले नाही. लघु उद्योगांचे छुपे कारस्थानऔद्योगिक क्षेत्रामध्ये एखादा छोटासा प्लॉट घेऊन त्यावर थोडेफार बांधकाम करून काहीतरी छोटासा उद्योग सुरु केल्याचे दाखवतात. अनेक ठिकाणी छुपे व्यवसाय रात्रीच्या शिफ्ट मध्ये करून अवैध रित्या पैसे कमावण्याचा प्रकार होत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत.
बेकायदा रसायनांचा गोरखधंदा फोफावला
By admin | Published: May 27, 2017 1:25 AM