अनेकांचे धाबे दणाणले : आणखी ५० ते ६० जणांच्या कुंडल्या तयार
बारामती/बाभुळगाव : उजनी धरणक्षेत्रामध्ये अवैध वाळूउपसा करणाऱ्यांना इंदापूर पोलिसांनी दणका दिला आहे. अवैध वाळूउपशाप्रकरणी तीन आरोपींना ६ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तसेच अनेक गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करण्यात आल्या असून, यापुढील काळात कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे इंदापूर पोलिस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश नंदू जगताप (वय २८, रा. हिंगणगाव, ता. इंदापूर, जि. पुणे), सौदागर बाळासाहेब ननवरे (वय २९, रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे), सुरक्षित वसंत राखुंडे (वय ३१, रा. कांदलगाव ता. इंदापूर) तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उजनी जलाशयातून रात्री अपरात्री बेकायदा वाळूची तस्करी करणे, वाहतूक करणे आदी प्रकार घडून येत होते. तसेच गावातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र जमवून करून गावात मारामारी करणे, अशा व्यक्तींची माहिती इंदापूर पोलिसांच्या वतीने घेण्यात आली होती. त्यांपैकी योगेश जगताप यांच्या टोळीवरील गुन्ह्यांची तपासणी केली. यामध्ये जगताप टोळी इंदापूर तालुक्यातील कांदलगाव, हिंगणगाव, इंदापूर शहर व तालुक्यातील इतर ठिकाणी त्याचे साथीदार रात्री उजनी धरणामधून वाळूउपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच बेकायदा जमाव जमवून मारामरी करणे, असे गंभीर प्रकार घडत होते. मात्र भीतीपोटी त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्याकडे या आरोपींविरुद्ध इंदापूर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या आदेशानुसार जगताप व त्याच्या साथीदारांना पुणे जिल्हयातील इंदापूर, दौंड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातून ६ महिने कालवधीकरिता तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेल्या तालुक्यांतील रहिवाशांना इंदापूर पोलिसांतर्फे तडीपार केलेल्या हद्दीत हे आरोपी आढळून आल्यास इंदापूर पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
----------------------
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा बाधा आणणाऱ्या, अवैध वाळूउपसा करणाऱ्या अंदाजे ५० ते ६० लोकांच्या कुंडल्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर देखील मोका अथवा तडीपारी अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिला आहे.