धनकवडी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातदेखील स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय उभारणीचे काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले. मात्र, या शौचालयाच्या नावाखाली स्वत:ची जागा उपलब्ध नसताना घराबाहेर अरुंद बोळ किंवा भररस्त्यातच शौचालय उभारून लोकांची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने राष्ट्रशक्ती संघटनेचे ज्ञानेश्वर दारवटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन जागा व योग्य प्रकारे काम होत नसल्याने बेकायदेशीर बांधकामाची चौकशी करून ती थाबंविण्याबद्दल मागणी केली आहे.अनधिकृत शौचालयामुळे रस्त्याची अडवणूक होत आहे. तसेच माननीय केवळ पुढे येणाऱ्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काम करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असून, कायम वापरात असणाऱ्या रस्त्याची अडवणूक केल्यास वहिवाटीचा रस्ता बंद होणार आहे. तसेच अपघातप्रसंगी अग्निशामक यंत्रणा, रुग्णसेवा देणारी वाहने जाण्या-येण्यावर अडवणूक होणार असल्याने अशा झोपडपट्ट्यांमधील बांधकामे तत्काळ थांबवली जावीत, अशी मागणी होत आहे. >स्वत:चे शौचालय बांधण्याइतपत जागा उपलब्ध नसल्यास सार्वजनिक शौचालयाचा वापर केला जावा, असा नियम असतानादेखील केवळ निधी खर्च करणे व मतदारराजाला खूष करण्याचे काम सध्या झोपडपट्टी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून करदात्याचा पैसा पाण्यात जाणार आहे. यापूर्वी महापालिकेने सार्वजनिक शौचालयाची सक्षम व्यवस्था केलेली असतानादेखील खासगी शौचालयाच्या उभारणीसाठी प्रत्येकी राज्य शासन व केंद्र सरकार मिळून १२,००० रुपयांचा निधी देत असल्याची माहिती राष्ट्रशक्ती संघटनेचे ज्ञानेश्वर दारवटकर यांनी दिली.
शौचालयाची बेकायदा बांधकामे
By admin | Published: June 11, 2016 1:06 AM