आकाशवाणी जवळून या गाड्या भरून सोलापूर, इंदापूर, भिगवण या ठिकाणी जातात. या मार्गावरील पुणे ग्रामीण
वाहतूक शाखा,हडपसर ठाणे, हडपसर वाहतूक शाखा, लोणी काळभोर, यवत, दौंड, भिगवण,इंदापूर, मोहोळ, सोलापूर ग्रामीण एवढ्या पोलीस ठाण्यांची हद्द लागते. मात्र पोलिसांची कोणतीच भिती न बाळगता अवैध वाहतुकीला ऊत आला आहे.
पोलिसांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या पण गाड्या यामध्ये आहेत. प्रत्येक गाडीसाठी हडपसर ते सोलापूर या दरम्यान अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे. वडाप गाडीत ९ ते १० माणसे कोंबून या मार्गावर वाहतूक करत असताना पोलीसांना मात्र ती कशी दिसत नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना लहान-लहान बाबींमध्ये देखील नियमाचा बाऊ दाखवून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक पोलीस अवैध प्रवासी वाहतुकीबद्दल एक शब्द ही बोलत नाहीत, कारवाई तर खूप लांबची बाब बनली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मागील काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूकीचे प्रमाण वाढू लागल्याने वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे.
--
संबधित वाहन चालकाकडे परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) चे फिट प्रमाणपत्र नसणे, वाहन पासिंग, वाहनाचा विमा न करणे, चालकाकडे वाहन परवाना नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, खासगी वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरणे अशा कित्येक प्रकारे नियमांना धाब्यावर बसवले जात आहे.