अवसरी : ठाणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातील रणरागिणी अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील तेजस्विनी दत्तात्रय चव्हाण (वय १९) हिचे नुकतेच ठाण्यातील लोकमान्यनगर येथे डेंगीच्या आजाराने निधन झाले. तिच्या स्मरणार्थ अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शालोपयोगी साहित्यवाटपानंतर स्मशानभुमी परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. तेजस्विनीच्या मागे आई, वडील, एक बहिण असा परिवार असुन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष दत्तात्रय नथुजी चव्हाण हे तिचे वडील होत. सध्या ती एअर होस्टेसचे शिक्षण घेत होती. तेजस्विनीच्या निधनानंतर आंबेगाव तालुक्यात प्रथमच शिवपिंडदान विधी करण्यात आला. यावेळी जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल बांगर, ह.भ.प.गणेश महाराज फडतरे यांनी शिवपिंडदान या विषयावर समाजाला प्रबोधन केले. शालेय साहित्यवितरण प्रसंगी सरपंच पवनकुमार हिले, उपसरपंच सचिन हिंगे, तेजस्विनीचे वडील दत्तात्रय चव्हाण, बहिण पल्लवी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण, कल्याण हिंगे पाटील, रमाकांत हिंगे, सर्जेराव हिंगे, अनिल हिंगे, नामदेव चव्हाण, विलास हिंगे आदी पस्थित होते.