- नेहा सराफ पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही भारत सरकारतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरी सन्मान जाहीर झाले. यामध्ये पुण्यातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पदमविभूषण सन्मान जाहीर झाला. रात्री उशिरा समजलेल्या या सुखद बातमीमुळे पुरंदरे कुटुंबीयांना आनंदाचा धक्काच बसला. विशेषतः बाबासाहेब तर काही क्षण निःशब्द झाले होते. यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, 'मी कृतार्थ आहे. आज मनापासून आनंद झाला आहे. आनंद इतका आहे की तो शब्दात व्यक्तही करता येत नाही.मी जन्माला आलो तेव्हा १९२२ साली ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी हे दिवस दिसतील, असं कधी वाटलं नव्हतं. इंग्रजांचे शासन अनुभवणारा मी, भारताचे शासन अनुभवेन आणि त्याही पलीकडे जात शासनाकडून माझा असा गौरव होईल, असे कधीही वाटले नव्हते. या प्रसंगी माझ्या गुरूंची प्रकर्षाने आठवण होत आहे. मला दोन गुरू होते. ज्यांनी मला शिकवलं माझे वडील पहिले गुरू आणि गणेश हरी खरे हे दुसरे. या दोघांनीही माझ्यावर संस्कार केले, अभ्यास कसा करायचा हे शिकवलं. त्यांनी सांगितला तसा मी तो केला आणि आजचा दिवस हे त्याचं सुंदर, गोड फळ आहे. माझ्यात भिनलेले जुने वाडे, किल्ल्यांच्या दाटून आल्या आहेत. आयुष्य अनेक आठवणींनी प्रसंगी भरलेले आहे.मला शिवचरित्राचा नाद आहे, असं लक्षात आल्यावर माझ्या वडिलांनी पहिल्यांदा सिंहगड दाखवला. त्यांनी जसा सिंहगड दाखवला ती आठवण कायम मनावर कोरलेली आहे. तो त्यांनी इतक्या छान पद्धतीने दाखवला की तीच पद्धत आजही मी वापरतो. निरनिराळी ऐतिहसिक स्थळ, मंदिर, मस्जिद दाखवताना तोच विचार आणि दृष्टी मी डोळ्यासमोर ठेवतो. या पुढच्या आयुष्याकडे बघताना फक्त लेखन आणि अभ्यास करण्याची इच्छा आहे. आता मी ९७ वर्षांचा आहे.आयुष्यातील या पुढील थकबाकीचे दिवस अभ्यासाकरिता किंवा लेखनासाठी खर्च करण्याची मनीषा आहे. आता व्याख्याने, सण, समारंभ, पुरस्कार साजरे करू नयेत, असंही वाटतं. ज्या पुरस्कारांच्या, गौरवच्या पदव्या आणि धन मिळालं ते सगळं शिवछत्रपतींच्या पायावर ओतलं आहे. आता जणू तेच म्हणत असावेत, आता हे सगळं थांबव, अभ्यासाला बस आणि मी यापुढे तेच करणार आहे.
मी कृतार्थ आहे; गुरूंच्या, गड-किल्ल्यांच्या आठवणीने बाबासाहेब गहिवरले!
By नेहा सराफ | Published: January 26, 2019 12:08 AM
दरवर्षीप्रमाणे यंदाही भारत सरकारतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरी सन्मान जाहीर झाले.
ठळक मुद्देदरवर्षीप्रमाणे यंदाही भारत सरकारतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरी सन्मान जाहीर झाले.पुण्यातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पदमविभूषण सन्मान जाहीर झाला.रात्री उशिरा समजलेल्या या सुखद बातमीमुळे पुरंदरे कुटुंबीयांना आनंदाचा धक्काच बसला.