डॉ. जयालाल म्हणाले, ‘आमचा कोणत्याही वैद्यकीय शाखेला विरोध नाही. मात्र, ‘मिक्सोपॅथी’ आम्हाला मान्य नाही. १००० शस्त्रक्रियांपैैकी केवळ ५८ शस्त्रक्रिया शिकून एमएस ही पदवी देणे कितपत योग्य आहे? एखाद्या शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? रुग्णांचा जीव धोक्यात घालणे कितपत बरोबर आहे? ग्रामीण भागात चांगली सेवा देणारे डॉक्टर नाहीत किंवा भारतात डॉक्टरांचा तुटवडा आहे, असे शासनाकडून सांगण्यात येते. आयएमएतर्फे भारताच्या कोणत्याही भागात रुग्णसेवा करण्यासाठी डॉक्टरांची उणीव भासू दिली जाणार नाही. मात्र, शासनाकडून त्यांना चांगले वेतन मिळायला हवे. डॉक्टरांची उणीव भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांवर अन्याय करणे आम्हाला मान्य नाही. व्यवसायाची शुध्दता जपण्यावर आमचा कायमच भर असेल.’
------------------
नवीन शैक्षणिक धोरण आणि सेंट्रल काऊन्सिल आॅफ इंडियन मेडीसिन या संस्थेने जारी केलेले परिपत्रक मागे घेऊन जनतेच्या आरोग्याला धोकादायक अशा खिचडी उपचारपध्दतीस अस्तित्वात येऊ देऊ नये, अशी मागणी आयएमएतर्फे करण्यात आली आहे. दिल्ली येथील मुख्यालय, तसेच सर्व राज्यांचे प्रतिनिधी क्रमाक्रमाने आणि स्थानिक पातळीवर सर्व १८०० शाखांचे प्रतिनिधी उपोषण करत आहेत. शेवटच्या दिवशी ‘राजधानी चलो’ असा नारा देऊन सर्व प्रतिनिधी मुंबईत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. खिचडी उपचारपध्दतीचे संभाव्य धोके विविध मार्गांनी समजावून सांगत लोकांमध्ये जनजागृती करणे हा यामागचा उद्देश असून, मागणी मान्य न झाल्यास सरकारविरोधात असहकार पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.