मनसेबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल :बाळासाहेब थोरात यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 09:00 PM2019-05-21T21:00:30+5:302019-05-21T21:03:43+5:30
आघाडी तर लांब मात्र प्रचारातही सोबत नको असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल होत असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिले.
पुणे :आघाडी तर लांब मात्र प्रचारातही सोबत नको असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल होत असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिले. एका कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेबाबतसकारात्मक वक्तव्य करत नेतृत्वाची भूमिका बदलत असल्याचे दाखवून दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, थोरात यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीत असणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनसेने चांगली भूमिका बजावली असल्याचे आम्हाला मान्य आहे असे उत्तर दिले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मनसेसोबत वाढत्या सलगीने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसचे नेतेच आता राज ठाकरे यांचे कौतुक करताना दिसत आहेत.
याशिवाय थोरात यांनी विधासभेतही राष्ट्रवादीसोबत आघाडी कायम राहणार असल्याचे सांगितले. भाजपच्या बाजूने निकाल दाखवत असलेल्या एक्झिट पोलवर भाष्य करताना त्यांनी निकाल एक्झिट पोलपेक्षा वेगळा असेल असे म्हटले. विखे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे गटनेतापद मिळणार का याविषयी बोलताना ते म्हणाले की, याबाबत आमची चर्चा झाली आहे, आम्हाला मतेही विचारली आहेत. याबाबत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अंतिम निर्णय घेतील.