ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करून शिवछत्रपतींचा जन्म सोहळ्याचा प्रसंग सादर करण्यात आला.
या वेळी हभप दर्शन महाराज कबाडी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम देदीप्यमान होता. महाराष्ट्राच्या या मातीत राष्ट्रपुरुष जन्माला आले, त्याच भूमीत आपणाला जन्म लाभला आपण सर्व भाग्यवान आहोत.
मुख्याध्यापक रवींद्र वाघोले म्हणाले की, छत्रपती शिवाजीराजे म्हणजे शक्ती आणि भक्तीचा संगम होय. या वेळी विद्यार्थी शर्विल कोल्हे, सई महामुनी, तन्वी भांबरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्या मंदिरातील इयत्ता नववी फ च्या विद्यार्थिनी व शिक्षिकांनी पाळणा गीत सादर केले. या शिवाय शिवछत्रपती शिवराय ,छत्रपती संभाजी, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते .
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यामंदिराच्या उपमुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक, पर्यवेक्षक डी. आर. कांबळे, सुनंदा खाडे, रामचंद्र शेगर व विद्या मंदिरातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन के. के. आल्हाट, सु. शि. दुबळे व इयत्ता नववी फ च्या विद्यार्थ्यांनी केले होते.
शिवजयंतीनिमित्त व्याख्यान सादर करताना ह.भ.प. दर्शन महाराज कबाडी.