पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाने तरुणाच्या खात्यातून ३ लाख ७ हजार रुपये सायबर चोरट्यांनी काढून घेतले होते. या तरुणाने तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करुन ही रक्कम गोठविली व त्याच्या खात्यातून गेलेली ३ लाख ७ हजार २१७ रुपये परत मिळवून दिले.
फिर्यादी तरुणाला सायबर चोरट्यांनी दुबईतील जुलेखा हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एक ऑनलाईन फार्म भरायला सांगितला. त्यानंतर फिर्यादीला रजिस्टेशन फी म्हणून १० रुपये भरावे लागतील, असे सांगून मोबाईलवर एक लिंक पाठविली. ही लिंक ओपन केली. त्यानंतर त्यांना एनीडेस्क व एस. एम. एस. फऑरवर्डर हे दोन ॲप डाऊनलोड करण्यास सांंगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर १० रुपये रजिस्टेशन फी भरल्यानंतर त्यांच्या डेबिट कार्डद्वारे ३ लाख ७ हजार २१४ रुपयांचे ट्रान्झेक्शन झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ते तातडीने सायबर पोलीस ठाण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिळालेल्या माहितीवरुन वेगवेगळ्या २ पेमेंट मर्चंटशी पत्रव्यवहार करुन पेमेंट नोडल ऑफीसरशी संपर्क साधून फिर्यादीचे अकाऊंडवरुन झालेले फ्राड ट्रान्झेक्शन थांबविण्यास सांगितले. त्यामुळे पेमेंट मर्चंटने हे व्यवहार थांबवून ते पैसे पुन्हा फिर्यादीच्या खात्यात वळविले. त्यामुळे फिर्यादी तरुणाला गेलेले सर्व पैसे परत मिळाले.
पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक निरीक्षक गणेश पवार, उमा पालवे, पुजा मांदळे यांनी ही कामगिरी केली........
कोणत्याही प्रकारे कोणाची फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. कोणाचे सांगण्यावरुन मोबाईल क्लोन ॲप डाऊन लोड करु नका. कोणत्याही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नका. तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी, क्रेडिट - डेबीट कार्डचे नंबर कोणालाही शेअर करु नका, असे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.फसवणूक झाल्यास तातडीने ७०५८७१९३७१/७०५८७१९३७५ या क्रमांकावर संपर्क साधावा