विशाल शिर्के- पुणे : जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ७ हजार १४४ पैकी ५ हजार ९८३ पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची पाच हजार रुपयांची मदत दिली असून, अजूनही अकराशेहून अधिक कुटुंबांना मदत पोचलेली नाही. जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मागितलेली तब्बल सहा कोटी रुपयांचा मदत निधी आचारसंहितेमुळे अडकला असल्याने उर्वरित निधी दिवाळीनंतरच उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात २५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह विविध ठिकाणी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली. त्यात हवेली, पुणे शहर, भोर, बारामती आणि पुरंदर तालुक्यांचा समावेश आहे. घरांची पडझड, वाहनांचे नुकसान, किराणा दुकान, बेकरी, लहान-मोठ्या हातगाड्या, घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, दुभती जनावरे वाहून जाणे असे नुकसान झाले होते. बाधितांना तातडीची मदत म्हणून १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती. जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पंचनामे केले आहेत. अजूनही अंतिम नुकसानीचा अहवाल समोर आला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर पाच हजार रुपयांच्या मदतीचे अधिकार आहे. त्यानुसार बाधितांना जिल्हा प्रशासनामार्फत तातडीची मदत देण्यात येत आहे. प्रशासनाने आतापर्यंत २ कोटी ९९ लाख १५ हजार रुपयांचे वाटप केले आहे. मात्र, अजूनही पुणे शहर आणि बारामती तालुक्यातील १ हजार १६१ कुटुंबियांना ५ हजार रुपयांची तातडीची मदत मिळालेली नाही. मदतनिधीसाठी आंबिल ओढा पूरग्रस्त संघर्ष समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पर्वती पायथ्यापासून खालील भागातील अंदाजे तीनशे ते साडेतीनशे घरांचे नुकसान झाल्याचा दावा आंदोलकांनी केला होता. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, आंबिल ओढा परिसर पूरग्रस्तांच्या बँक खात्यांची अडचण होती. तसेच, इतर ठिकाणी देखील बँक खात्यांमुळेच पाच हजार रुपयांची तातडीची मदत देता आली नाही. संबंधित तहसीलदारांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली जाणारी पाच हजार रुपयांची तातडीची मदत त्यांना मिळेल. जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे बाधितांना तब्बल १६ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप केले आहे. तेव्हाची एक कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. ती, सप्टेंबर महिन्यातील बाधितांना देण्यात येईल. ......७६ गावांतील ७ हजार १४४ कुटुंबे बाधितसप्टेंबरमधील पुरामुळे हवेली, पुणे शहर, भोर, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील ७६ गावांतील ७ हजार १४४ कुटुंबे बाधित झाली होती. त्यातील ग्रामीण भागातील १ हजार १९१ आणि शहरी भागातील ५,९५३ कुटुंबांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील १ हजार ३० आणि शहरी भागातील ४ हजार ९५३ कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने ५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली आहे. .....जिल्हाधिकारी स्तरावरील मदत देण्याचे काम सुरू आहे. उर्वरित दहा हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीसाठी राज्य सरकारकडे ६ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. ही रक्कम मिळाल्यावर त्याचेही तातडीने वाटप केले जाईल. - डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी...... २५ सप्टेंबरच्या पुरातील बाधित कुटुंबे तालुका बाधित ग्रामीण-शहरी मदत दिलेली दिलेली शिल्लक गावे बाधित कुटुंबे रक्कम कुटुंबे हवेली १८ १९३९ १९३९ ९६,९५,००० ० पुणे शहर २ ४१०० ३४२३ १,७१,१५,००० ६७७ भोर ३ २१ २१ १,०५,००० ० बारामती १२ ८४२ ३५८ १७,९०,००० ४८४पुरंदर ४१ २४२ २४२ १२,१०,००० ०एकूण ७६ ७१४४ ५९८३ २,९९,१५,००० ११६१
पूरग्रस्तांची तातडीची मदत आचारसंहितेच्या कचाट्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:56 AM
जिल्ह्यात २५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह विविध ठिकाणी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली...
ठळक मुद्देसरकारकडे सहा कोटींची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३ कोटींचे वाटप