बारामती : पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरण देखील पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'मेमू' लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि फौजिया खान उपस्थित होते. पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' सुरु करण्यात यावी याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले. याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
दौंड स्थानकावरुन बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसला दौंडपर्यंत प्रवासाची परवानगी द्यावी. पुणे - सिकंदराबाद, चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर , संपर्क क्रांती या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा. हैद्राबाद -मुंबई एक्स्प्रेस गाडीला भिगवण येथे थांबा देण्यात यावा, जेजुरी स्थानकावरील पादचारी उड्डाण पुलाचे विस्तारीकरण, रेल्वे स्थानकात महिलांसाठी वेटींग रुम सुरु करून तेथे महिला आरपीएफ अधिकारी तैनात करण्यात याव्यात अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सहजपूर आणि कासुर्डी येथे रेल्वेला थांबा मिळावापुणे- दौंड असा रेल्वे प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. सहजपूर आणि कासुर्डी येथे रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पियुष गोयल यांच्या लक्षात आणून दिले.