पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रूंदीकरणासाठी तातडीने भुसंपादन करा. छोटे घर मालक, व्यवसायिक यांना भुसंपादनासाठी रोख मोबदला देण्यात येणार आहे. मोठया जागा असणारे जागा मालक यांना काही प्रमाणात रोख मोबदला आणि टीडीआर देण्यात येणार आहे. जागा ताब्यात आल्यानंतर तातडीने काम सुरू करा असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.
कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , नगरअभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, मालमत्ता विभागाचे प्रमुख महेश पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक प्रकाश कदम, संगिता ठोसर, सामाजिक कार्यकर्त राजाभाउ कदम, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, प्रतीक कदम, महेश धूत, तुषार कदम आदी उपस्थित होते.
कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपीरोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक आणि पिसोळी पालिका हद्दीपर्यंत आहे. या रस्त्याचे काम २४१ कोटींचे असून, आतापर्यंत केवळ ४८ कोटीच खर्च झाले. भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७१० कोटी हवे आहेत. राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरीपर्यंत रस्ता पूर्ण, त्यापुढे काम झालेच नाही. खडी मशीन चौकाच्या अलीकडे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे; पण त्यापुढेही काम झालेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम सलग न झाल्याने नागरिकांना याचा फारसा फायदा होत नाही.
भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची अखेर रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदी केली जाणार आहे. यामध्ये सेवारस्त्याचा समावेश असला तरी सायकल ट्रॅक, पदपथ तसेच वृक्षारोपणासाठीचा ‘ग्रीन ट्रॅक’ वगळले आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. यांपैकी २०० कोटी रुपये सरकारकडून घेतले जाणार आहे. हा निधी विधानसभेच्या पुरवणी मागणीमध्ये मंजूर झाला आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी तातडीने भुसंपादन करण्यात येणार आहे. मोठया जागा असणारे जागा मालक यांना काही प्रमाणात रोख मोबदला आणि टीडीआर देण्यात येणार आहे. जागा ताब्यात आल्यानंतर तातडीने काम सुरू करा असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.
रस्त्याचे काम तीन टप्प्यात काम करणार
कात्रज कोंढवा रस्त्याचे तीन काम टप्पात करण्यात येणार आहे .पहिला टप्पात २७ कोटी पैकी १५ कोटी रुपये जागा मालकांना देण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात पाच एकर जागा टीडीआर आणि एफएसआय मार्फत ताब्यात घेण्यात येण्यात आहे . तिसऱ्या टप्प्यात ३६ जागा मालकांना ९७ कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
आयुक्त येणार म्हणून रात्रीतून केली कामे-
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी कात्रज कोंढवा रस्त्याची पाहणी केली. या पाहणीपूर्वी या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने साफसफाईचे काम करण्यात येत होते. तसेच या रस्त्यावरी खड्डे बुजविण्याचे काम सोमवारी रात्री करण्यात आले. अनेक ठिकाणी डांबर टाकण्यात आले. आयुक्त येणार म्हणुन पालिका प्रशासनाने जी कामे तत्परतेने केली. तीच कामे अन्य वेळीही तातडीने करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.