इंदापूर : ऐतिहासिक वास्तू असलेली इंदापूर शहराची वेस व तलावाचे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसात प्रचंड नुकसान झाले. या दोन्ही वास्तू इंदापूरच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत, या दुरुस्तीचे काम लवकर मार्गी लावा. नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी रामराजे कापरे यांच्याकडे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे.
इंदापूर शहरात इतर विकास होत असताना, महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तलावावरून गेलेल्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व धोकादायक बनलेला आहे, तसेच इंदापूर शहरातील वेशीचीही पडझड झालेली आहे. दोन्ही ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते व अपघात होण्याची शक्यता आहे. मागील एक वर्षामध्ये शहरात विकासासाठी निधी आलेला आहे, परंतु ह्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, तरी धोकेदायक झालेला तलाव व गावची वेस प्राधान्याने दुरुस्त करा अशी मागणी काँग्रेस पक्षांनी केली. या वेळी चर्चेसाठी इंदापूर नगरपालिकेचे विरोधीपक्षनेते पोपट शिंदे उपस्थित होते.
इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल सावंत, शहराध्यक्ष चमन भाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, जिल्हा सरचिटणीस जाकिर भाई काजी, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, सरचिटणीस निवास शेळके, राहुल वीर, सचिव महादेव लोंढे, शहर उपाध्यक्ष तुषार चिंचकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक - १४इंदापूर गावाची वेस
फोटो ओळ : इंदापूर शहरातील तलावाच्या कडा ढासळून झालेली दुरवस्था.