पुणे - एका नातेवाईकांकडे लग्नसमारंभ आणि नामकरण कार्यक्रमानिमित्त गोऱ्हे खुर्द गावात आलेल्या बुलढाण्यातील मुली खडकवासला धरणाच्या तीरावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तिथे पाय घसरून पाण्यात पडल्या. त्यात दोन तरूणींचा मृत्यू झाला आहे, तर इतर सात जणींना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात यश आहे. खुशी संजय खुर्दे (वय १३, रा. सोळकी, जि. बुलढाणा ), शीतल भगवान टिटोरे (वय १५, रा. आंबेडझरी, ता.जि. बुलढाणा) असे बुडून मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. मात्र, या दुर्घटनेवेळी स्थानिक शेतकरी संजय माताळे आणि रमेश भामे यांनी जीवाची बाजी लावून बुडत असलेल्या इतर मुलींना वाचवले.
धरणा तिरावर मुलींच्या बुडण्याचा आरडाओरडा होत असल्याचा आवाज आला. याच वेळी जवळच असलेल्या स्मशानभूमीत सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता. तिथे गोरेखुर्द आणि झाळणवाडी गावचे ग्रामस्थ जमले होते. त्यापैकी संजय सीताराम माताळे आणि रमेश नामदेव भामे या दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन सात मुलींना वर काढले. माताळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुली व एका महिलेला एक-एक करुन पाण्याच्या कडेला आणले. परंतु, दोघींना वाचवता आले नाही. "ओरडण्याचा आवाज आला तसा मी पळालो आणि पाण्यात उडी घेतली. माझ्या मागे काही लोक मदतीसाठी आले होते. पाच जणींना मी बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व काठावर थांबलेल्यांकडे दिले,'' असे माताळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
संजय माताळे आणि रमेश भामे यांनी दाखवलेल्या धाडसाचं सध्या कौतुक होत आहे. संजय माताळे हे शेतकरी असून स्थानिक असल्यामुळे त्यांना तेथील पाण्याचा अंदाज होता. त्यामुळेच, मागेपुढे न पाहाता त्यांनी धरणात उडी घेतली, सोबतीला रमेश भामे हेही आले. या दोघांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न करत ७ मुलींना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर, तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले. या दोघांच्या प्रयत्नामुळे ७ मुलींचा जीव वाचला. त्यामुळे, दोघांचेही कौतुक होत आहे.
संजय नारायण लहाणे हे गोऱ्हे खुर्द गावात ग्रीन थंब संस्थेत वॉचमनचे काम करतात. खडकवासला धरण तीरावर लावलेल्या झाडांची निगराणी करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. तिथेच संस्थेने दिलेल्या झोपडीवजा घरात ते आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या नातेवाईकांचे लग्न समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त आणि एका नातेवाईकाच्या मुलाच्या बारशानिमित्त घरी काहीजण आले होते. त्या नातेवाईकांपैकी नऊ मुली धरण तीरावरील घरात राहावयास रविवारी रात्री आल्या होत्या. सोमवारी (दि.१५) सकाळी नऊच्या दरम्यान या सर्व मुली कपडे धुण्यासाठी धरण तीरावर गेल्या असता त्यातील एकीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. पाणी खोल असल्याने तिला वाचवण्यासाठी बाकीच्या सात जणींनी आरडाओरडा करत तिला धरण्याचाही प्रयत्न केला असता त्याही पाण्यात गेल्या. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले.
यावेळी कुमुद संजय खुर्दे ( वय ७, रा. बुलढाण), पायल संजय लहाणे (वय १८, रा बुलढाणा ), शीतल अशोक धामणे (वय १६ जळगाव), राखी सुरेश मांडवे (वय १६, बुलढाणा ), पायल संतोष साळवे (वय १८, रा. सुरत, गुजरात), मीना संजय लहाणे (वय ३० बुलढाणा ), पल्लवी संजय लहाणे (वय १० बुलढाणा ) या मुलींना वाचविण्यात यश आले.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच हवेली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवलदार विलास प्रधान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माहिती घेतली. तोपर्यंत अग्निशामन दलाचे प्रमुख सुजित पाटील जवानासह आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी येऊन बुडालेल्या दोन मुलींचा शोध घेतला. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे नितीन नम यांनी सांगितले.