पुणे : कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत शांततेत साजरा करावा लागला. अनंत चतुर्दशीच्या विसर्जन दिवशी (दि.२०)ही पुणेकरांनी संयम पाळला. सार्वजनिक ठिकाणी, नदीच्या घाटावर विसर्जनासाठी गर्दी न करता, घरगुती स्वरूपात मोठ्या प्रमाणात विसर्जन केले, तसेच हजारो मूर्तींचे दानही केले. सार्वजनिक हौदांमध्येही एक लाख ४४ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. संकलित मूर्तींची संख्या एक लाखापेक्षा जास्त होती.
पुणे महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी तयारी केली होती. यासाठी क्षेत्रीय कार्यालय व प्रभागनिहाय गणेशमूर्ती संकलन केंद्र व फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. घरच्या घरी गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम कार्बोनेट जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात, तसेच गणेशमूर्ती संकलन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले होते, तसेच प्रत्येक सोसायटीतून निर्माल्य गोळा करण्याचीही सोय करण्यात आली होती.
चौकट
अशी होती तयारी
अमोनियम बाय कार्बोनेट वाटप केंद्रे - २७७
अमोनियम बाय कार्बोनेट वाटप - ९६,२०३ किलो
निर्माल्य संकलन केंद्रे - २८४
निर्माल्य संकलन - २,९२,६७७ किलो
चौकट
असे झाले विसर्जन
विसर्जन फिरते हौद - २१७
विसर्जित गणेशमूर्ती - १,४४,८०५
गणेशमूर्ती संकलन केंद्रे - २५५
संकलित गणेशमूर्ती - १,०६,३१६
एकूण विसर्जित मूर्ती - २,५१,१२१