शिक्रापूर येथे गणपती विसर्जन दरम्यान वेळ नदीमध्ये गणपती व निर्माल्य विसर्जन केल्यामुळे अनेक दिवस नदी पात्रात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी गणपती विसर्जन घाट बनविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला. शिक्रापूर बाजार मैदान, पाटवस्ती बंधारा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कृत्रिम विसर्जन घाट बनविण्यात आला आहे. या ठिकाणी गणपती विसर्जन दरम्यान गणपती व निर्माल्य विसर्जन संकलित केले जाणार आहे. सदर विसर्जन घाटाची पाहणी सरपंच रमेश गडदे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे, पूजा भुजबळ, मोहिनी संतोष मांढरे, समता परिषदेचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, ग्रामपंचायत कर्मचारी सिकंदर शेख, विलास पवार, गणेश भुजबळ यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान, विसर्जन घाट येथे संकलित होणाऱ्या गणेश मूर्तिकार व्यक्तींना तसेच निर्माल्य हे सेंद्रिय खतनिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.
शिक्रापूर येथे गणपती विसर्जन घाट तयार करण्यात आलेला असून, त्या ठिकाणीच नागरिकांनी गणपती विसर्जन करावे, प्रत्येकाने शेवटच्या दिवशी विसर्जनाचा आग्रह न ठेवता, तसेच गर्दी न करता गणपती विसर्जन करावे असे सरपंच गडदे यांनी या वेळी सांगितले आहे.
फोटो – शिक्रापूर, ता. शिरूर येथे निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन घाटाची पाहणी करताना ग्रामपंचायत पदाधिकारी.(धनंजय गावडे)