पुणे : दरवर्षी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात अन् ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन आणि विसर्जन होत असतं. १२५ वर्षांपासून चालत आलेली पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरेला कोरोनामुळं खंड पडला. त्यामुळं मागील वर्षांपासून उत्सव साधेपणानं साजरा केला जात आहे. मागच्या वर्षीही पुण्यातील गणेश मंडळांनी सर्व नियम व अटींचं पालन करून उत्सव साधेपणानं साजरा केला होता. यंदाही पुण्यात गणरायाचं आगमन उत्साहात पण कोरोनाचे नियम पाळूनच झालं आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मानाच्या गणपती मंडळांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक होणार नसून मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचं ठरवलं आहे.
परंपरेनुसार मानाच्या गणपतींचं क्रमवारीत होणार विसर्जन
पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन सकाळी ११ वाजता होणार असून, त्यानंतर ४५ मिनिटानंतर क्रमवारीनुसार होणार आहे. श्री कसबा गणपती ११ वाजता, तांबडी जोगेश्वरी ११.४५ वाजता, गुरुजी तालीम १२.३०, श्री तुळशीबाग १.१५ मिनिटांनी, केसरी वाडा २ वाजता, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती २.४५ मिनिटांनी विसर्जित होईल. सकाळी दहा वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला परंपरेनुसार पुष्पहार अर्पण केल्यानंतर विसर्जनाचा सोहळा सुरू होईल.
कसबा गणपती
मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर सकाळी साडेदहा वाजता पुष्पहार अर्पण करतील. परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून मांडवाजवळील कृत्रिम हौदापाशी आणली जाईल. आरती झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता मूर्तीचे विसर्जन होईल. त्यानंतर येथे घरगुती गणपती मूर्तींच्या विसर्जनाची सोय उपलब्ध असेल.
तांबडी जोगेश्वरी
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर सकाळी पाऊणे बारा वाजता मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. विसर्जनासाठी मांडवाजवळ कृत्रिम हौद उभारण्यात येणार आहे.
गुरुजी तालीम मंडळ
मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाला महापौर दुपारी साडेबारा वाजता पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर गुलालाची उधळण करून मांडवाजवळील कृत्रिम हौदात मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. तुळशीबागमानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर दुपारी सव्वा वाजता पुष्पहार अर्पण करतील. श्री तुळशीबाग मंडळाने आकर्षक गजकुंड केलेले असून त्यावर फुलांची सजावट असणार आहे. पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्सव मंडपात गणरायाचे विसर्जन मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांच्या हस्ते होणार आहे.
केसरी गणेशोत्सव
मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्ती परंपरेनुसार पालखीतून मांडवात आणली जाईल. महापौर दुपारी दोन वाजता गणपतीच्या मूर्तीला आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मांडवातील कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मूर्तीला महापौर दुपारी पाउणे तीन वाजता पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मांडवाजवळीला कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन आणि उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी सहा वाजून ३६ मिनिटांनी मंदिरामध्ये मूर्तीचे विसर्जन होणार आहे. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. ट्रस्टने केलेल्या ऑनलाइन दर्शन सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे कौतुक केले आहे.www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live
अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे विसर्जन सायंकाळी साडेसहा वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. विसर्जनासाठी मंडळाने मांडवाजवळ गजगवाक्ष अमृत कलश तयार केला आहे.