आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत टाळ - मृदुंगाचा निनाद, ढोल ताशांचा गजर व ज्ञानोबा - माऊली तुकारामांच्या जयघोषात लाडक्या "गणरायाला" भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पवित्र इंद्रायणी तीरावर ठेवण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणेश मंडळ तसेच घरगुती मूर्त्यांचे औपचारिक विसर्जन करून मुर्त्या संकलित करण्यात आल्या. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी साडेसहा पर्यंत सुमारे दोन हजारांहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन झाल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव व किशोर तरकासे यांनी दिली. दरम्यान शहारातील बहुतांश मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुका सुरू आहेत.
पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदुषण टाळण्यासाठी आळंदी नगरपालिकेच्या वतीने गणेश मुर्त्यां संकलित करण्याची संकल्पना राबविली जात आहे. यापुर्वीही पालिकेने ही मोहिम राबवली आहे. यंदा इंद्रायणीतीरीच्या दोन्ही बाजूला गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद ठेवण्यात आले आहेत. तर विसर्जित मूर्त्यांचे संकलन करण्यासाठी पाच केंद्र उभारली आहेत. त्यामुळे आळंदी, केळगाव, चऱ्होली, धानोरे, येरवडा, दिघी, भोसरी तसेच पिंपरी महापालिकेतील बहूतांश गावातील नागरिकांची गणेश मूर्ती विसर्जित करण्याची उत्तम सोय झाली आहे.
घरगुती गणेश मूर्तींचे अधिक संकलन करण्यात आले असून सर्व संकलित केलेल्या गणेश मुर्त्या आळंदी नगरपरिषदेने देहू व मोशी येथे नेऊन विसर्जित केल्या आहेत. शहरात विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी, चिंचोशी, मोहितेवाडी, सिद्धेगव्हाण, शेलगाव, दौंडकरवाडी, कोयाळी - भानोबाची, वडगाव - घेनंद, सोळू, गोलेगाव, मरकळ, धानोरे, चऱ्होली, भोसे, रासे, काळूस, कडाचीवाडी आदी गावातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाचे भिमाभामा नदीत विसर्जन केले. सर्वत्र गुलाल तसेच डॉल्बी विरहित मिरवणूका काढण्यात आल्या होत्या.