धनकवडी : अनैतिक संबंधातील अडखळा दूर करण्यासाठी पत्नीने प्रियकरासह पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पतीने आजाराला कंटाळून स्वत:च आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर तिचा बनाव उघडकीस आला असून भारती विद्यापीठ पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. जबरी चोरीचा बनाव करून पतीचा प्रियकरांमार्फत खून करण्याचा प्रकार वारजे येथे नुकताच घडला होता.
प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी राणी गोपीनाथ इंगूळकर ( ३२, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज) आणि नितीन शंकर ठाकर ( ४५, रा. कुरण, ता. वेल्हा) यांना अटक केली आहे. गोपीनाथ बाळू इंगूळकर (३७, रा. दुगड शाळेजवळ, सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ संभाजी बाळू इंगूळकर ( ४४, रा. वृंदावन कॉलनी, संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ इंगूळकर हे मार्केट यार्डात हमाली काम करत होते. त्यांना मधुमेहाचा तसेच मणक्याचा त्रास होता. पत्नी राणी हिने २३ तारखेला गोपीनाथचा भाऊ संभाजी यांना फोन करून गोपीनाथ घरात बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती दिली. संभाजी घरी दाखल झाल्यावर तिने गोपीनाथ मधुमेह आणि मणक्याच्या त्रासाला कंटाळले होते. यामुळे ते स्वत:चा गळा दाबून आत्महत्येचा प्रयत्न करत होती, अशी माहिती दिली.
संभाजी यांनी गोपीनाथ यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे मृत घोषित केल्यावर शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा गोपीनाथ यांचा मृत्यू गळा दाबला गेल्याने झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी राणीला बोलावून घेत चौकशी केली, तेव्हा तिने गोपीनाथ मणक्याच्या त्रासाने वैतागले होत, ते नेहमी मला मारून टाका असे म्हणायले. घटनेच्या दिवशी त्यांनी माझा हात हातात घेऊन स्वत:चा गळा दाबून घेत आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांचा यावर विश्वास बसला नाही. त्यांनी अधिक चौकशी करता, राणीने तिचा प्रियकर नितीन यास घरी बोलावून पतीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.
गोपीनाथचा खून झाला तेव्हा त्याची दहा वर्षांची मुलगी घराच होती. या घटनेमुळे ती खूप घाबरली होती, गोपीनाथचा गळा दाबत असताना ती घाबरून स्वयंपाक घरात लपून बसली होती. नितीन हा राणीचा नातेवाईकच असून तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो.