शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होते. विद्यार्थी वर्गात शिक्षकांनी दिलेला अभ्यास शाळेतच किंवा घरी पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचा लेखनाचा सराव होतो. परंतु, कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी घरी आहेत. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांकडून गृहपाठ पूर्ण करून घेण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. एकूणच विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. काही पालक विद्यार्थ्यांकडून नियमितपणे अभ्यास करून घेतात. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होत आहे. परंतु, काही ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याचा अभ्यास करून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झाला आहे.
------------
कोरोनामुळे विद्यार्थी वर्षभरापासून घरी आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनावर परिणाम झाला.त्यामुळेच मुख्याध्यापक व प्राध्यापक संघटनेने राज्य मंडळाकडे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून द्यावा, अशी मागणी केली . विद्यार्थ्यांच्या लेखनाला गती नसल्यामुळे मंडळाने अर्धा तास वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
- हनुमंत कुबडे, अध्यक्ष,मराठी अध्यापक संघ
-------------
सरावाने स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर काढता येते. एकदा हस्ताक्षर स्थिरावले की त्यात बदल होत नाही. त्यामुळे कोरोना काळात जरी लेखनाचा सराव कमी झाला असला तरी सर्वच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावर त्याचा परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांनी सतत लेखनाचा सराव करावा.
- अनिल गोरे, मराठी भाषा अभ्यासक
---------------------
विद्यार्थी घरात बसून ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले आहेत. शिक्षकांकडून त्यांना मर्यादित लेखन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झाला आहे. शिक्षकांनी ही बाब गंभीरपणे घ्यायला हवी.
- सुवर्णा सूर्यवंशी, पालक
------------------
विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. घरात बसून अभ्यास करा, असे सांगूनही मुलं ऐकत नाहीत. ऑनलाइन शिक्षणाने कानावर काही चांगल्या गोष्टी पडत असल्या तरी विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित होण्यास मर्यादा येत आहेत.
- मनोज केदारे, पालक