वाडा परिसरात पर्यटन क्षेत्राला खीळ बसली आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक उपाशीपोटी घरात बसून आहेत. वाडा परिसरातील मंदिरे, धरणे, निसर्गरम्य परिसरात फिरायला बंदी आहे. त्यामुळे पर्यटक दुर्मिळ झाले आहेत. पर्यायाने सर्व छोटे मोठे व्यावसायिक चिंतेत आहेत.
बारा ज्योतिर्लिंग आहेत. त्यात श्रीक्षेत्र भीमाशंकरचा समावेश होतो. पण मंदिर बंद असल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. हजारो नागरिक भीमाशंकर येथील मंदिराजवळ व्यवसाय करून पोट भरत होते. कोरोनाच्या महामारीत उपाशी राहण्याची वेळ आली आहे. हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पानफुलवाले, प्रसाद दुकानमालक, पुजारी, गॅरेज दुकानदार असे हजारो नागरिक कामाविना बेकार झाले.
त्यात चक्रीवादळ आले. दुष्काळात तेरावा महिना आला. घरांचे छत्र उडून गेले. भिंती पडल्या. नागरिक बेघर झाले. तोंडावर पावसाळा आला. अशा परिस्थितीत जिणे मुश्कील झाले. कोविडमुळे निष्पाप जीव गेले. लस मिळत नाही. अशा कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
चासकमान धरण परिसरातील हॉटेल बंद असल्याने व्यावसायिक संकटात सापडले आहेत.