पुणे : आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, या संदर्भात केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी अध्यादेश काढला आहे. सर्व राज्य सरकार त्याचे पालन करतील असा मला विश्वास आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात लढण्यासाठी विरोधी पक्षांकडे सक्षम चेहरा नाही. "मजबूर नव्हे मजबूत सरकार " हा निवडणुकीचा असणार मुख्य मुद्दा असणार आहे. 'हमारा घर भाजपा का घर' असा पक्षाचा मुख्य अजेंडा असणार आहे. यात जे मतदार भाजपाला मतदान करणार आहेत. ते आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून पाठींबा देतील. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पुण्याच्या स्थानिक मुद्यांवरही मत मांडले. पाणीकपातीविषयी त्यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवत अधिक भाष्य करण्याचे टाळले. शहरात सुरू असलेल्या हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत त्यांनी सकारात्मक मत व्यक्त करताना दिल्लीचे उदाहरण दिले.ते म्हणाले की, दिल्लीत हेल्मेटसक्ती असून त्याचे सर्वच राजकीय पक्षाचे नेते हेल्मेट घालतात. त्यामुळे पुण्यातील हेल्मेटसक्तीला विरोध करण्याचे कारण नाही.