पुणे : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बहुतेक सर्व महसुली कामे ठप्प आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना सोबतच महसुली कामे मार्गी लावण्यासाठी नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व उपविभागीय अधिकारी , तहसीलदार सर्व ठिकाणी "झिरो पेडन्सी " उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये देशमुख यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन पुढील दोन महिन्यांत सर्व प्रलंबित प्रकरणे, अर्जांचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत .
पुणे जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.त्यानंतर शासनाने लाॅकडाऊन जाहिर केले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गावपातळीवरील तलाठी ते जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महसूल कर्मचारी कोरोनाच्या कामामध्ये व्यस्त आहेत. यामुळे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून बहुतेक सर्व महसुली काम ठप्प आहेत. याबाबत देशमुख यांनी सांगितले की, आता जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसिलदार कार्यालय सर्व ठिकाणी झिरो पेशन्सी आणि डेली डिस्पोजेबल सिस्टीम राबविण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन येत्या दोन महिन्यांत सर्व प्रलंबित अर्ज व प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता कोरोना सोबतच इतर विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांची कामे देखील मार्गी लागतील असा विश्वास देखील देशमुख यांनी व्यक्त केला. ------पाच दिवसांत नऊ तालुक्यांचा दौरापुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख हे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच झपाटून कामाला लागले आहेत. तेही केवळ ऑफीसमध्ये बसून नाही तर ऑन फिल्डवर जाऊन सर्व यंत्रणेला कामाला लावले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत देशमुख यांनी कोरोनाची ग्राऊंडवर वस्तुस्थिती काय आहे हेे पाहण्यासाठी बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड , मावळ आणि मुळशी या तालुक्यांचा दौरा केला. यामध्ये प्रत्यक्ष कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयासह अधिग्रहीत केलेल्या खाजगी हाॅस्पिटलला देखील भेट दिली. औषधांचा पुरवठा व्यवस्थित होतोय का, रुग्णांना मिळणारे जेवण, रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या , रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवणे आवश्यक असल्याने त्यात वाढ केली, प्रत्यक्ष रुग्णांसोबत चर्चा केली.