पुणे : भुतकाळात घडलेल्या गोष्टींचा वर्तमानात वेध घेऊन भविष्य घडविण्यासाठी दस्तावेज महत्वाचा असतो. वर्तमान हा उद्याचा इतिहास असल्याने महत्वाचा दस्तावेज जतन करून ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व शाळा, महाविद्याालये, खासगी संस्था, सरकारी कार्यालयांमध्ये दस्तावेज विभाग करण्याचे बंधन घालायला हवे, असे मत राज्यसभा खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले.
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात डॉ. सहस्त्रबुध्दे यांची बीजभाषण झाले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर, कुलगुरू प्रा. वसंत शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी उपस्थित होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी सह महासंचालक के. एन. दिक्षीत, सरस्वती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. कल्याणरमण, अमेरिकेच्या इलिनॉय विद्यापीठातील भाषाशास्त्र व संस्कृतचे मानद प्राध्यापक प्रा. हान्स हॉक आणि पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे माजी संचालक डॉ. व्ही. एन. झा यांना मानद डि. लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. तर एम. ए., एम.फील, व पीएच.डी. अभ्यासक्रमातील १२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
सहस्त्रबुध्दे म्हणाले, उज्ज्वल भवितव्यासाठी इतिहास आणि पुरातत्व यांचे अध्ययन ही काळाची गरज आहे. पुर्वी संग्रहालय शास्त्र, पुरातत्व शास्त्र हे विषय करिअर म्हणून निवडले जात नव्हते. आजहीच तीच स्थिती असली तरी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला आहे. या शाखांचे महत्व अनेक संशोधनांमुळे अधोरेखित झाले आहे. पुरातत्वशास्त्र आणि इतिहास ह्या भुतकाळ आणि भविष्यकाळाला जोडणाऱ्या महत्वाच्या कड्या आहेत. व्यक्तीच्या अस्मितेसाठी ते अत्यावश्यक आहे.
इतिहास व संस्कृतीचे जतन करणे, त्यामध्ये खोलवर संशोधन करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. ‘आयसीसीआर’च्या माध्यमातून हे काम व्यापक करता येईल. डेक्कन कॉलेजची हा वारसा जपण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे, असे प्रतिपादन डॉ. करमळकर यांनी केले. सांस्कृतिक वारशाचे जतन करताना प्राचीन ज्ञानशाखांची मदत घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. जामखेडकर यांनी अध्यक्षीय भाषमात सांगितले. प्रा. शिंदे विद्यापीठाच्या वर्षभरातील कामाचा आढावा घेतला. डॉ. जोशी यांनी आभार मानले. प्रा. सोनल कुलकर्णी-जोशी यांनी आभार मानले.