पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यानुसार नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. येत्या १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विद्यापीठातील सर्व विभाग बंद राहणार असून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घरी राहून विद्यापीठ व संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी.मात्र,अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सुरक्षा विभाग, आरोग्य केंद्र, स्थावर व गृहव्यवस्थापन विभाग आवश्यकतेनुसार पूर्ण क्षमतेने सुरू राहील असे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढले आहे.
राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठाने सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम (वर्क फ्रॉम होम ) करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी आळीपाळीने (रोटेशन) कामावर हजर रहावे.तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांना विशेष व महत्त्वाच्या कामासाठी बोलवल्यास त्यांने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे. मात्र, कोणीही प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामावर बोलवू नये. तसेच पूर्व परवानगीशिवाय कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये.तसेच परवानगीशिवाय कामावर अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची रजा गृहीत धरली जाईल,असे स्पष्ट आदेश विद्यापीठाने दिले असून सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. -------------विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना विद्यापीठाच्या कार्यालयीन वेळेतच सर्व प्रवेश द्वारातून शक्यतो आळखपत्र तपासूनच प्रवेश दिला जाईल.इतर व्यक्तींना कार्यालयीन कामकाजासाठी ऑनलाइन व दूरध्वनीद्वारे संपर्क साधाता येईल.