पुणे : विद्यापीठांसह महाविद्यालयांत सहाय्यक प्राध्यापक पदावर नाेकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या राज्य पात्रता परीक्षा ‘सेट’ परीक्षेचे येत्या ७ एप्रिल रोजी आयाेजन करण्यात आले आहे. आगामी वर्षात हाेणाऱ्या दाेन्ही परीक्षा पारंपरिक ऑफलाईन पध्दतीने हाेणार असल्याचेही विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 'सेट' चे आयोजन केले जाते. विद्यापीठातर्फे ७ एप्रिल २०२४ राेजी हाेणारी ३८ वी सेट परीक्षा ही पारंपरिक ऑफलाईन ( पेन आणि पेपर) पद्धतीने घेतली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तसेच राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभागाचे सदस्य सचिव डॉ. विजय खरे यांनी या संदर्भात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, विभागाकडून जानेवारी महिन्यांत सेट परीक्षेसाठी प्रवेश अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली जाण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन परीक्षा २०२५ पासून
पुढील वर्षी हाेणाऱ्या ३८ आणि ३९ व्या सेट परीक्षेचे पारंपरिक ऑफलाईन पध्दतीने आयाेजन कले जाणार आहे आणि त्यानंतर २०२५ पासून ४० वी सेट परीक्षा केंद्रनिहाय ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल असेही परिपत्रकात नमूद केले आहे.