पुणे : शहरातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले आहेत. कोरेगाव पार्क आणि येरवडा भागातील वाहतूक ठराविक कालावधीसाठी वळविण्यात आली आहे.
त्यानुसार कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू वरून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे. हा बदल ३१ मार्च ते २१ एप्रिलदरम्यान राहणार आहे. यावेळी पर्यायी मार्ग म्हणून
- पुणे रेल्वेस्थानकाकडून येऊन येरवडाकडे जाणारी वाहने मोबाज चौक, मंगलदास रोड, ब्ल्यू डायमंड चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, पर्णकुटी चौक मार्गे पुढे जातील.
- पुणे रेल्वेस्थानकाकडून येऊन बोटब्लबकडे जाणारी वाहने मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले-पाटील रोडने पुढे जातील.
- बोटक्लबरोडने येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने श्रीमान चौकातून सरळ अमृतलाल मेहतारोडने कोरेगाव पार्क चौकातून पुढे जातील.
- येरवड्याकडून येऊन पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, ब्ल्यू डायमंड चौकातून डावीकडे वळून पुढे जातील.
येरवडा वाहतूक विभागांतर्गत, एन. एम. चव्हाण चौकाकडून ॲडलॅब चौकाकडे जाणारी वाहतूक तसेच ॲडलॅब चौकाकडून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक दि. २८ मार्च ते २७ जून या कालावधीत आवश्यकतेनुसार बंद केली जाईल. यावेळी पर्यायी मार्ग म्हणून,
- बिशप स्कूलकडून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड ॲडलॅब चौकातून उजवीकडे वळून कल्याणीनगर लेन नं. ७ येथून डावीकडे वळून एन. एम. चौकाकडे जाईल.
- ए.बी.सी. चौकातून येणारी वाहतूक एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळून कल्याणीनगर लेन नं. ३ येथून उजवीकडे वळून ॲडलॅब चौकाकडे मार्गस्थ होईल.