पुणे : मान्सून राज्यात रविवारी दाखल झाला असला तरी, अजून तो महाराष्ट्रात बरसरलेला नाही. त्यामुळे आधीच आठवड्यातून एक दिवस पुणेकरांवर आलेली पाणी कपात आणखी वाढणार का असा प्रश्न निर्माण झाला असताना, सध्या तरी याबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.
पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात आजमितीला ५ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. हा पाणी साठा पुणेकरांची आणखी अडीच महिने तहान भागऊ शकणार आहे. सध्या तरी शेतीसाठी आवर्तन नसल्याचे जलसंपदा विभागाने अद्याप तरी कळविले नसल्याने हा सर्व पाणी साठा पुणेकरांसाठी उपलब्ध राहणार आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरासह राज्यात येत्या आठ दिवसांत पावसाची सुरूवात होणार आहे. यामुळे पाणी टंचाईबाबत सध्या तरी कोणतीही चिंता नाही. आजमितीला पुणे शहराला दररोज १६५० एमएलडी पाण्याची गरज असून, उपलब्ध पाणी साठ्यानुसार ते किमान पुढील अडीच महिने पुणे शहराला पुरणार आहे.
मान्सून लांबणार आहे की नाही याबाबत वेधशाळेकडून पुणे महापालिकेला अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही. जर पाऊस लांबणार असेल असे पत्र महापालिकेला मिळाले तर शहरातील पाणी पुरवठ्याबाबतच्या बदलाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. अशी माहिती पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली.