कात्रज (पुणे) :पुणे शहराकडून साताऱ्याकडे जाणारा रस्ता (जुना कात्रज घाट रस्ता ) यावर मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांकडून वारंवार तक्रारीनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची आता दुरुस्ती करण्यात येणार आहे. सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. सातारा ते पुणे होणारी वाहतूक जुन्या कात्रज घाटातून न होता ही वाहतूक नवीन बोगद्यातून दरी पूलामार्ग पुण्याकडे वळविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढलेल्या आदेशात देण्यात आलेली आहे. ३ डिसेंबर २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत हा आदेश लागू असणार आहे.
कात्रज शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्रमांक १२६ (जुना कात्रज घाट ) यावर डांबरीकरणाचे तसेच मजबुतीकरणाचे काम होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडून सदरील आदेश काढण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, व पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांच्याकडून या संदर्भात हरकत नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
रस्त्याचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. दोन्ही बाजूने वाहतूक चालू असल्यास काम करता येत नाही त्यामुळे एकेरी वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देण्यात आला होता. त्यानुसार ही एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहा.अभियंता श्रेणी १ एम.एम.रणसिंग यांनी दिली आहे.