पुणे : कोरोना काळात रेल्वेचे वेळापत्रक पार कोलमडून गेले होते. कोरोनाचे निर्बंध जसजसे कमी होत गेले तसतसा हळूहळू एकेक गाड्या रुळावर आल्या मात्र रेल्वेतील बेडरोल, जनरल बुगी बंदच होत्या. एकेक सुविधा सुरू झाल्या असून येत्या २९ जूनपासून पुण्यातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यामध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरू होणार आहे.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यातून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये बेडरोलची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू इतर एक्स्प्रेसच्या एसी बोगीमध्येही बेडरोल सुविधा सुरू करण्यात आली. मात्र जनरल बोगीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता जनरल बोगीलाही सिटींग आरक्षण बोगीचे तिकीट आकारले जात होते. त्यामुळे कोणत्याच रेल्वे गाड्यांना जनरल बोगीची सोय नव्हती. काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई इंटरसिटीमध्ये जनरल बोगी सुरू करण्यात आली. त्यानंतर पुणे- दौंड पॅसेंजर आणि पुणे-बारामती पॅसेंजरमध्येही जनरल बोगी जोडण्यात आली आणि जनरल तिकीट सुरू करण्यात आले होते. मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्यांना अद्याप जनरल तिकिटाची सुविधा सुरू करण्यात आली नाही. मात्र येत्या २९ जूनपासून पुण्यातून सुटणाऱ्या सर्व गाड्यांना जनरल तिकिटांची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या निर्बंधामुळे सर्व गाड्यांचे जनरल तिकीट बंद करण्यात आले होते. जनरल बोगीमध्येही सिटींग आरक्षण तिकीट लागू करण्यात आले होते. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून महिनाभर आधी आरक्षण करण्यात येते त्यामुळे जनरल बोगीत तातडीने जनरल तिकीट सुविधा सुरू करणे शक्य नव्हते. मात्र आता जनरल बोगीतील आरक्षित तिकीट उपलब्ध केली जात नाही, त्यामुळे २९ जूनपासून जनरल बोगी रिकामी राहिली आणि तेथे जनरल तिकिटधारकांना प्रवेश मिळू शकेल.
मनोज झंवर,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे