बारामतीच्या ‘दादां’चा अकलूजच्या ‘दादां’ना शह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:22 PM2020-04-23T14:22:05+5:302020-04-23T14:28:42+5:30
अलीकडच्या काही काळात सोलापूरच्या पालकमंत्रिपदी आलेले भरणे हे तिसरे आमदार आहेत.
सतीश सांगळे -
कळस : इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. अलीकडच्या काही काळात सोलापूरच्या पालकमंत्रिपदी आलेले भरणे हे तिसरे आमदार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अनुक्रमे दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती या पदी झाली होती. मात्र, प्रकृतीच्या काळ्जीस्तव या दोघांनीही माघार घेतली. यामुळे रिक्त झालेल्या या पदावर आता आव्हाड यांच्या जागी भरणे यांची नियुक्ती केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द या नियुक्तीमध्ये महत्त्वाचा मानला जात आहे. भरणे यांची नियुक्ती करून बारामतीच्या ‘दादां’नी अकलूजच्या ‘दादां’ना शह दिल्याचे मानले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. भरणे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने इंदापूर तालुक्यात याचे स्वागत केले. इंदापूर तालुक्याच्या लगतच सोलापूर जिल्हा आहे. तालुक्याच्या तिन्ही बाजूंनी सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यावर प्रदीर्घकाळ एकहाती सत्ता प्रस्थापित केलेले शरद पवार यांचे विश्वासू अकलूज (माळशिरस) येथील विजयसिंह मोहिते पाटील (दादा) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला अनुकूल भूमिका घेतली. त्यामुळे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभव पत्करावा लागला. उपमुख्यमंत्री पवार आणि इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे राजकारणातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. मोहिते पाटील गटाकडून नेहमीच पाटील यांना मदतीची भूमिकाघेण्यात येते.
इंदापूर व माळशिरस (अकलूज) तालुका लागून असल्याने जिल्हा अपवाद वगळता सर्व व्यवहार, व्यावसाय एकत्र आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्याकडून तालुक्यात होणारा शिरकाव उपमुख्यमंत्री पवार यांना अडचणीचा ठरत होता. त्यामुळे कट्टर समर्थक भरणे यांची नियुक्ती करून अजित पवारांनी सोलापुरात वर्चस्व निर्माण केले आहे. मंत्री भरणे अजातशत्रू म्हणून ओळखले जातात.
........
..कारखाना संचालक ते पालकमंत्री
भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या दत्तात्रय भरणे यांना शेती करत असतानाच कारखान्यात संचालक म्हणून ९१ ला पवार कुटुंबीयांनी संधी दिली. तेथून पुढे कायम भरणे यांचा राजकीय आलेख चढता राहिला. कारखाना संचालक ते अध्यक्ष, जिल्हा बँक संचालक ते अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष, व आमदार ते राज्यमंत्री, पालकमंत्री, हा राजकीय प्रवास शांत, संयमी भरणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या बळावर संपादन केला आहे.
..............
सोलापूरचे इंदापूर ‘कनेक्शन’
च्सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील शेळगाव येथील यशवंत माने राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. आता सोलापूरचे पालकमंत्रिपदही इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे आले आहे.